* मुंबई निर्देशांकाकडून २६,५०० चा तर निफ्टीद्वारे ७,९०० ला गवसणी
* सेन्सेक्सची सहा दिवसात एक हजार अंशांची भर
* विदेशी गुंतवणूकदारांची सोमवारची खरेदी ५०० कोटी
सलग दुसऱ्या दिवशी विक्रमावर स्वार होत भांडवली बाजार मंगळवारी नव्या उच्चांकाला पोहोचला. सहाव्या सत्रातही तेजी नोंदविताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आठवडय़ातील दुसऱ्या व्यवहारात २६,५०० च्या पुढे गेला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ७,९०० चा स्तर तोडला. २९.७१ अंश वधारणेसह सेन्सेक्स २६,४२०.६७ वर गेला. तर २३.२५ अंशांची भर पडल्याने निफ्टी ७,८९७.५० पर्यंत पोहोचला. दोन्ही प्रमुख निर्देशांक एक टक्क्य़ांहून अधिक प्रमाणात उंचावले.
विकासाचा आराखडा नमूद करणाऱ्या पंतप्रधानांच्या भाषणाला पसंतीची प्रतिक्रिया देताना भांडवली बाजाराने सोमवारी आठवडय़ाच्या सुरुवातीलाच नव्या उच्चांकावर नेऊन ठेवले होते. सत्रातील निर्देशांकाची झेप वगळता असेच काहीसे चित्र बाजारात मंगळवारीदेखील उमटले.
मंगळवारच्या व्यवहारात सेन्सेक्स २६,५०० च्या पुढे जात २६,५३०.६७ पर्यंत झेप घेता झाला. तर सत्रात निफ्टीने बुधवारी ७,९०० चा टप्पा ओलांडला. व्यवहारअखेर निफ्टी ७,८९७.५० वर बंद झाला.
सलग सहा व्यवहारातील तेजीमुळे मुंबई निर्देशांकात १,०९० अंशांची भर पडली आहे. तर सोमवारी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी ४७३.४२ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. तर स्थानिक संस्थागत गुंतवणूकदारांची खरेदी ४९०.०४ कोटी रुपयांची राहिली. मंगळवारी सेन्सेक्समधील ३० पैकी १९ समभाग वधारले. भेल, एनटीपीसी, कोल इंडिया, सेसा स्टरलाईट, डॉ. रेड्डीज्, अॅक्सिस बँकेच्या समभागांना मागणी राहिली. तर वाहन, बांधकाम, ऊर्जा, तेल व वायू, भांडवली वस्तू, सार्वजनिक उपक्रम, आरोग्यनिगा हे क्षेत्र आघाडीवर राहिले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये २.२५ टक्क्य़ांसह वाहन निर्देशांक आघाडीवर राहिला.
रुपया उंचावला
भांडवली बाजारापाठोपाठ परकी चलन व्यवहारात रुपयाही मंगळवारी सलग दुसऱ्या सत्रात तेजाळला. डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलन ९ पैशांनी भक्कम बनले. रुपया ६०.६७ वर स्थिरावला. व्यवहारात रुपया ६०.५५ पर्यंत उंचावला. रुपया आता गेल्या तीन आठवडय़ाच्या उंच्चांकावर पोहोचला आहे. ३१ जुलै रोजी चलन ६०.५५ वर होते. सोमवारीही रुपया ४५ पैशांनी उंचावला होता. गेल्या आठवडय़ातील सातत्याच्या आपटीमुळे चलन ६१ रुपयांपर्यंत घसरले होते.
कच्चे तेल दर स्थिरावले
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गेल्या जवळपास दिड वर्षांच्या किमान पातळीवर स्थिरावले आहेत. प्रति पिंप तेल आता १०२ डॉलपर्यंत खाली आले आहेत. जुलै २०१३ मध्ये कच्चे तेल या समकक्ष होते. तर २०१४ च्या सुरुवातीलाही कच्च्या तेलाचा दर १०७ डॉलर प्रति िपप होता. तो यंदाच्या जूनमध्ये ११५ डॉलर प्रति पिंपपर्यंत पोहोचला होता. भारताला लागणाऱ्या एकूण तेलापैकी सुमारे ८० टक्के तेल आयात करावे लागते. कच्च्या तेलाच्या दरातील घसरण स्थानिक कंपन्यांचे नुकसान कमी करण्यास लाभदायी मानली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा