गेल्या आठ सप्ताहांमधील सर्वात मोठी घसरण दाखवीत, सेन्सेक्सने सोमवारी ३३९ अंशांनी, तर निफ्टी निर्देशांकांची १०० अंशांनी गटांगळी घेतली. सहसंस्थापकांकडून झालेल्या समभागांची विक्रीने गडगडलेल्या इन्फोसिसच्या घसरणीची प्रमुख निर्देशांकांनाही बाधा झाल्याचे दिसून आले.
सेन्सेक्स निर्देशांकांच्या घसरणीत इन्फोसिस या देशातील दुसऱ्या मोठय़ा सॉफ्टवेअर सेवा कंपनीच्या समभागाच्या आपटीचे प्रमुख योगदान राहिले. नारायण मूर्ती, नंदन निलेकणी, शिबूलाल या सह-संस्थापकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी कंपनीतील ६,४८४ कोटी रुपयांच्या समभागांची सोमवारी विक्री केली. त्याचा या समभागावर नकारात्मक परिणाम दिसून आला आणि तो बीएसईवर तब्बल ४.८८ टक्क्य़ांची घसरण दाखवत स्थिरावला. इन्फोसिसच्या बरोबरीने माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील टीसीएस आणि विप्रो या अन्य तगडय़ा समभागांमध्येही विक्री दिसून आली.
अमेरिकेतील रोजगारनिर्मितीचे चित्र लक्षणीय सुधारत असल्याचे ताज्या आकडेवारीतून स्पष्ट झाले असून, तेथील मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्र्हकडून अपेक्षित व्याजदरातील वाढ ही नजीकच्या काळात केली जाईल, असे कयास केले जात आहेत. स्थानिक बाजारात मंदावलेल्या विदेशी गुंतवणुकीचा ओघ हे त्याचेच प्रत्यंतर असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. सरलेल्या शुक्रवारच्या व्यवहारात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून १०९.४५ कोटींच्या समभागांची विक्री झाल्याचे दिसून आले. सोमवारच्या दिवसात नफा कमावण्यासाठी विक्रीचा जोर वाढण्यामागे विदेशातून होत असलेल्या या वाढत्या निर्गुतवणुकीबाबत चिंताच कारणीभूत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. एकूण बीएसई आयटी निर्देशांकात ३.१८ टक्क्य़ांची घसरण सोमवारच्या व्यवहारातून दिसली.
एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक यांच्यासह धातू क्षेत्रातील सेसा स्टरलाइट, हिंडाल्को आणि टाटा स्टील या समभागांच्या घसरणीनेही प्रमुख निर्देशांकांच्या पडझडीला हातभार लावला.
सोमवारच्या निफ्टीमधील १००.०५ अंशांच्या घसरणीसह, या निर्देशांकाने ८,५०० ही भावनिकदृष्टय़ा महत्त्वाची पातळी सोडून, ८,४३८.२५ वर विश्राम घेतला. तर २९ हजारांकडे सरसावत असलेला सेन्सेक्स पुन्हा २८ हजारांच्या सीमेवर लोटला गेला आहे. ३३८.०७ अंशांच्या घसरणीसह तो दिवसअखेर २८,११९.४० वर येऊन ठेपला. चलन बाजारात रुपयाही दिवसअखेर डॉलरच्या तुलनेत ६ पैसे घसरत ६१.८३ वर आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा