आठवडय़ाच्या सुरुवातीलाच गेल्या दीड महिन्याच्या वरच्या टप्प्यावर पोहोचत भांडवली बाजारांनी सोमवारी मोठी निर्देशांक वाढ नोंदविली. जवळपास दीडशे अंश वाढीमुळे सेन्सेक्स २८,२५० च्या पुढे गेला. तर ३६.९० अंश वाढीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,५०० च्या पुढे, ८,५५०.७० वर गेला आहे. निफ्टीनेही महिन्यातील सर्वोच्च टप्पा सोमवारी गाठला.
मुंबई निर्देशांकात १४०.१२ अंश वाढ होऊन सेन्सेक्स २८,२६२.०१ वर बंद झाला. मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांची ही ५ डिसेंबर २०१४ नंतरची मोठी पातळी होती. यावेळी बाजार २८,४५८.१० वर होता. मुंबई निर्देशांकाची सोमवारची वाढ ही गेल्या सलग तीन व्यवहारातील होती. या दरम्यान सेन्सेक्स जवळपास १,००० अंश, ९१५.१९ अंशांनी वाढला आहे. टक्केवारीत ही वाढ ३.३५ टक्के आहे. यामध्ये १५ जानेवारी २०१५ च्या एकाच व्यवहारातील ७२८.७३ अंश झेपेचाही समावेश आहे. मुंबई निर्देशांकातील एकाच सत्रातील ही उडी गेल्या पाच वर्षांतील सर्वोत्तम ठरली होती. शुक्रवारी विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारात १,०९९.९३ कोटी रुपये ओतले आहेत.
गेल्या तिमाहीतील नफ्यातील उत्तम कामगिरीमुळे विप्रो या देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या माहिती तंत्रज्ञान कंपनीचा समभाग ५ टक्क्य़ांनी उंचावला. कंपनीचे वित्तीय निष्कर्ष शुक्रवारी जारी झाले होते. ग्राहकपयोगी वस्तू, भांडवली वस्तू, औषधनिर्मिती, ऊर्जा क्षेत्रातील समभागांमध्ये गुंतवणूकदारांचा ओघ दिसला. तर सेन्सेक्समध्ये आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, अ‍ॅक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रिज, लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, सन फार्मा, भारती एअरटेल, गेल, भेल या समभागांना मागणी राहिली. दरम्यान व्यवहारातील नफेखोरीने हीरो मोटोकॉर्प, स्टेट बँक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस, इन्फोसिसमध्ये मूल्य घसरण झाली. सेन्सेक्समधील २२ समभागांचे मूल्य वधारले. तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये तब्बल ३.३५ टक्क्य़ांसह ग्राहकपयोगी वस्तू निर्देशांक वधारला.
आशियाई बाजारात सोमवारी जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, तैवानमधील प्रमुख निर्देशांक हे एक टक्क्य़ापर्यंत वाढले होते. तर चीनच्या भांडवली बाजारातील समभाग तब्बल ७ टक्क्य़ांपर्यंतची आपटी नोंदवित होते. त्याचबरोबर हाँगकाँगमधील निर्देशांकही दीड टक्क्य़ांहून अधिक प्रमाणात घसरले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सध्या ८,२०० ते ८,५०० दरम्यान प्रवास करतो आहे. आशियाई बाजार नरम दिसत असले तरी येथे, भारतीय अर्थव्यवस्थेत कंपन्यांच्या वधारत्या नफ्यातील तिमाही निकालांबाबत आशावाद व्यक्त केला जात आहे.
जयंत मांगलिक,
अध्यक्ष (किरकोळ वितरण), रेलिगेअर सिक्युरिटीज.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex nse nifty rise to over 6 week high