बुद्धपौर्णिमेनिमित्त प्रमुख आर्थिक व्यवहार बंद असतानाही सुरू राहिलेल्या भांडवली बाजाराने बुधवारचा दिवस सुटीसारखाच घालविला. सेन्सेक्स, निफ्टीला गेल्या सलग तीन व्यवहारात विक्रमी टप्प्यावर नेऊन ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांनी आठवडय़ातील तिसरा दिवस आरामात घालविला. परिणामी, सेन्सेक्स किरकोळ अशा ५६.११ अंश घसरणीसह २३,८१५.१२ पर्यंत खाली आला. तर व्यवहारअखेर निफ्टी मंगळवारच्या पातळीवरच स्थिरावला.
मतदानोत्तर चाचणीत लोकशाही आघाडी सरकारच्या बाजुने भरघोस कल पाहून गुंतवणूकदारांनी दोन्ही प्रमुख निर्देशांकांना सर्वोच्च अशा ऐतिहासिक टप्प्यावर नेऊन ठेवले होते. असे करताना गेल्या तीन व्यवहारात सेन्सेक्स १,५४७ अंश वाढीमुळे २४ हजारानजीक तर निफ्टी ४५६ अंश वधारणेमुळे ७,२०० नजीक पोहोचला होता. मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टीने व्यवहारात अनुक्रमे २४,०६८.९४ व ७,१७२.३५ पर्यंत झेप घेतली होती.
सेन्सेक्सचे बुधवारचे व्यवहार मात्र मंगळवार बंदच्या तुलनेत २११ अंशांपर्यंत उंचावले होते. तर निफ्टीचा प्रवास ७,१४२.३५ ते ७,०८०.९० असा राहिला. मुंबई शेअर बाजारात माहिती तंत्रज्ञान, आरोग्यनिगा, भांडवली वस्तू, तेल व वायू क्षेत्रातील समभागांमध्ये विक्री नोंदली गेली. आहे. तर बांधकाम, पोलाद, ग्राहकपयोगी वस्तू क्षेत्रातील समभागांमध्ये नव्याने खरेदी झाली. व्यवहारात २३,८७१.२३ पर्यंत झेप घेणाऱ्या बाजारात अखेर नफेखोरी अवलंबली गेली.
सेन्सेक्समधील १४ कंपनी समभागांचे मूल्य घसरले. यामध्ये डॉ. रेड्डीज्, महिंद्र अॅण्ड महिंद्र, एचडीएफसीसारखे समभाग होते. बँक निर्देशांकांने उत्तम तर तेल व वायू निर्देशांकाने सुमार कामगिरी बजाविली. नवे भांडवल ओतण्याचा सरकारचा निर्णय व सरकारी हिस्सा कमी करण्याची रिझव्र्ह बँक समितीची शिफारस यामुळे सार्वजनिक बँकांचे समभाग मूल्य दुहेरी आकडय़ांपर्यंत उंचावले.
उद्या काय होणार?
अंदाजित निकालांवर विक्रमावर झुलणारे भांडवली बाजार प्रत्यक्षातील मतमोजणीवर काय प्रतिक्रिया देतात, याकडे ‘दलाल स्ट्रीट’ची आता नजर आहे. शुक्रवारच्या अपेक्षित ‘सर्किट ब्रेकर’साठी बाजार नियामक सज्ज असतानाच बाजार विश्लेषकांनीही आकडेमोड सुरू केली आहे. यानुसार, लोकशाही आघाडी सरकारला लक्ष्यानजीक यश मिळाल्यास सेन्सेक्स १५ टक्क्यांहून अधिक उसळू शकतो.
शेअर बाजाराचा ‘बँक हॉलिडे’
बुद्धपौर्णिमेनिमित्त प्रमुख आर्थिक व्यवहार बंद असतानाही सुरू राहिलेल्या भांडवली बाजाराने बुधवारचा दिवस सुटीसारखाच घालविला.
First published on: 15-05-2014 at 12:43 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex nse nifty snap four day winning streak blue chips fall