नव्या आठवडय़ाची सुरुवात ऐतिहासिक टप्प्यासह करणाऱ्या भांडवली बाजाराला मंगळवारी रेल्वे अर्थसंकल्पाने निरुत्साहित केले. एकाच व्यवहारात तब्बल ५०० हून अधिक अंशांची आपटी नोंदवीत सेन्सेक्सने गेल्या १० महिन्यांतील सर्वात मोठी घसरण राखली. मुंबई निर्देशांक २६ हजारांखाली येतानाच निफ्टीनेही त्याचा ७,८००चा स्तर सोडला.
व्यवहारात २६,१९०.४४ पर्यंत पोहोचणाऱ्या सेन्सेक्सने दिवसअखेर ५१७.९७ अंश घसरण नोंदवीत थेट २५,५८२.११चा तळ गाठला. तर निफ्टीने सत्राच्या सुरुवातीलाच ७,८००चा स्पर्श केल्यानंतर अखेर १६३.९५ अंश घट नोंदवीत ७,६२३.२०पर्यंत जाणे पसंत केले. दोन्ही निर्देशांक दोन टक्क्यांहून अधिक आपटले.
दुपारी १२च्या सुमारास रेल्वे अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वी भांडवली बाजाराचा प्रवास तेजीत होता. ऐतिहासिक उच्चांकासह नव्या सप्ताहाची नोंद करणाऱ्या सेन्सेक्सने मंगळवारच्या सुरुवातीच्या टप्प्यातच नवा टप्पा गाठला. सेन्सेक्स या वेळी २६,२०० पर्यंत तर निफ्टीने ७,८०० ची वेस गाठली. दिवसअखेर मात्र दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी सप्टेंबर २०१० नंतरची सर्वात मोठी व्यवहारातील घसरण राखली.
अर्थसंकल्प जारी होताच भांडवली बाजारात उतरण लागली. यामध्ये रेल्वेशी संबंधित समभागही घसरू लागले. त्यांच्यात ८ टक्क्यांपर्यंतची आपटी या वेळी नोंदली जात होती. दिवसभरात ते २० टक्क्यांपर्यंत आपटले. रेल्वे अर्थसंकल्पात पायाभूत प्रकल्पांमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीचा उल्लेख होऊनही समभागांना भाव मिळाला नाही.
भांडवली बाजाराने गेल्या दोन्ही व्यवहारांत तेजी नोंदविली आहे. असे करताना सेन्सेक्स २६ हजारांवर पोहोचला होता. तर निफ्टीने ७,८००ची नोंद केली होती. हे दोन्ही स्तर मंगळवारी रेल्वे अर्थसंकल्पामुळे मागे फिरले. रेल्वे अर्थसंकल्पात माहिती तंत्रज्ञान, खासगी क्षेत्राला वाव, मालवाहतुकीवर भर असे असूनही हे घडले.
मुख्य अर्थसंकल्पाला दिशा मिळेल, असे काहीही रेल्वे अर्थसंकल्पात नसल्याची प्रतिक्रिया गुंतवणूकदारांनी निर्देशांकांमध्ये घसरण नोंदवून केल्याची प्रतिक्रिया बाजार विश्लेषकांनी दिली आहे. त्यामुळेच ऐतिहासिक टप्प्यावर असलेल्या बाजाराचा लाभ पदरात पाडून घेण्याच्या हेतूने गुंतवणूकदारांनी नफेखोरी अवलंबली असावी, असा अंदाजही बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केला. बाजार आता गुरुवारच्या मुख्य अर्थसंकल्पाकडे डोळे लावून आहे.
सेन्सेक्समध्ये यापूर्वी ३ सप्टेंबर २०१३ रोजी सर्वाधिक ६५१ अंशांची घसरण नोंदली गेली होती. सेन्सेक्समधील केवळ दोनच समभाग तेजीत राहिले. उर्वरित सर्व २८ समभागांचे मूल्य घसरले. यामध्ये भेल, एनटीपीसीसारख्यांची आपटी तर ८ टक्क्यांपर्यंतची होती.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बांधकाम हा सर्वाधिक, ७.१६ टक्क्यांसह आपटला. सर्व १२ क्षेत्रीय निर्देशांक घसरणीच्या यादीत राहिले. स्मॉल व मिड कॅममध्येही विक्रीचा दबाव दिसून आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा