अमेरिकेची मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्र्हने अर्थउभारीच्या कार्यक्रमात चालू वर्षअखेरपासून माघार घेण्याच्या केलेल्या घोषणेचे अपेक्षेप्रमाणे भांडवली बाजारात भयंकर विपरीत पडसाद गुरुवारी दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक – सेन्सेक्सने दोन वर्षांतील सर्वात मोठी म्हणजे ५२६ अंशांची (पावणे तीन टक्के)गटांगळी दाखविली, तर चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाने नांगी टाकताना ५९.९३ असा तळ गाठला. वस्तू वायदे बाजारात सोने-चांदी या मौल्यवान धातूंमध्ये अनुक्रमे ३.५% आणि ६ % घसरणीची प्रतिक्रिया दिली. रोखे बाजारात विदेशी गुंतवणुकीच्या आकस्मिक मोठय़ा पलायनाने, घसरणीचे खालचे सर्किट गाठले गेल्याने या बाजारातील व्यवहारांना काही काळ अपरिहार्यपणे टाळे लावणे भाग पडले.
एकाच दिवसात निर्देशांकात जवळपास सव्वा पाचशे अंशांची घसरण नोंदविणाऱ्या शेअर बाजारात गुरुवारी गुंतवणूकदारांच्या खिशाला जबर झळ बसली. प्रत्येक १० समभागांमागे ७ समभागांचे भाव घसरले इतकेच नाही ते वर्षांच्या नीचांकाला येऊन पोहचले. या पडझडीत गुंतवणूकदारांच्या ६३.२१ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेवर फुंकर मारली गेली, तर एकूण बाजारमूल्य १.५५ लाख कोटींनी रोडावले.
मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक- सेन्सेक्सने जवळपास दोन वर्षांत प्रथमच एकाच दिवसात सर्वात मोठी आपटी गुरुवारी घेतली. ५२६.४१ अंश घसरणीसह सेन्सेक्स १८,७१९.२९ पर्यंत खाली आला, तर १६६.३५ अंश नुकसानासह ५,७०० च्याही खाली येत ५,६५५.९० पर्यंत स्थिरावला. गेल्या दोन महिन्यांची नीचांकीला आलेले दोन्ही प्रमुख निर्देशांक अनुक्रमे २.१७४ व २.८६ टक्क्यांनी घसरले होते. तर एमसीएक्स-एसएक्सचा एसएक्स ४० निर्देशांकही तब्बल ३०८.२२ अंश घटीसह (२.७० टक्के) ११,११८.८५ वर बंद झाला.
दुपारच्या सत्रापूर्वीच सेन्सेन्सने ४२३ अंशांची घट घेत १९ हजाराचीही पातळी सोडली. याच वेळी निफ्टीही ५,७०० च्या खाली आला होता. दरम्यान डॉलरच्या तुलनेत ढासळत्या रुपयानेही ऐतिहासिक नीचांकीचे पडसाद बाजारावर अधिक तीव्र केले.
दिवसअखेर सेन्सेक्सने सप्टेंबर २०११ नंतरची एकाच सत्रातील सर्वात मोठी आपटी नोंदविली. यापूर्वी मुंबई निर्देशांक एकाच व्यवहारात ७०४ अंशांने कोसळला होता. तर निफ्टीनेही गुरुवारी ५,७०० ची पातळी सोडली. दोन्ही निर्देशांक त्यांच्या गेल्या दोन महिन्यांच्या तळाला विसावले आहेत.
पोलाद निर्देशांकातील जिंदाल, टाटा स्टील, हिंदाल्कोसारख्या कंपन्यांचे समभाग १० टक्क्यांपर्यंत घसरले होते. सेन्सेक्समधील ३० पैकी तब्बल २८ समभागांचे मूल्य खालावले. तर सर्व १३ क्षेत्रीय निर्देशांकही घसरले. बांधकाम निर्देशांकाला सर्वाधिक, ५.१८ टक्क्यांचा फटका बसला. एकाच सत्रातील मोठय़ा घसरणीपोटी गुंतवणूकदारांची मालमत्ताही दीड लाख कोटी रुपयांनी कमी झाली.
आशियाई बाजारात चीन, हाँककाँग, जपान, सिंगापूर, तैवान, दक्षिण कोरिया येथील शेअर बाजारही १.३५ ते २.८८ टक्क्यांपर्यंत घसरले होते. तर युरो झोनमधील फ्रान्स, जर्मनी, ब्रिटनचे भांडवली बाजारही २ टक्क्यांपेक्षा कमीचा प्रवास करत होते.
शेअर बाजार, रोखे बाजार, सराफ बाजारात दाणादाण!
अमेरिकेची मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्र्हने अर्थउभारीच्या कार्यक्रमात चालू वर्षअखेरपासून माघार घेण्याच्या केलेल्या घोषणेचे अपेक्षेप्रमाणे भांडवली बाजारात भयंकर विपरीत पडसाद गुरुवारी दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक - सेन्सेक्सने दोन वर्षांतील सर्वात मोठी म्हणजे ५२६ अंशांची (पावणे तीन टक्के)गटांगळी दाखविली, तर चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाने नांगी टाकताना ५९.९३ असा तळ गाठला.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-06-2013 at 12:10 IST
TOPICSबिझनेस न्यूजBusiness Newsबीएसई सेन्सेक्सBSE Sensexशेअर बाजारShare Marketस्टॉक मार्केटStock Market
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex plunges 526 pts its single day biggest fall in 2 years