अनपेक्षित व्याजदर वाढविण्याचा निर्णय पतधोरणाद्वारे जाहिर करणाऱ्या गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्यावरील गुंतवणूकदारांची नाराजी भांडवली बाजारातील व्यवहाराच्या दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. पाव टक्का रेपो दरवाढीमुळे आता बँकांनीही महाग कर्जाचे संकेत दिल्याने मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सोमवारी त्याच्या २० हजाराच्या टप्प्याच्याही खाली आला. ३६३ अंश घसरणीसह सप्ताहरंभ करणाऱ्या सेन्सेक्सच्या दफ्तरी व्याजदराशी निगडित बांधकाम, भांडवली वस्तू तसेच ग्राहकोपयगोगी वस्तू निर्देशांकही आपटले. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतदेखील दिवसअखेर १२२ अंशांनी घसरत ५,८९० पर्यंत खाली आला.
रिझव्र्ह बँकेच्या रेपो दरवाढीनंतर बँकांनी कर्ज व्याजदराचे संकेत दिल्याने तसेच बांधकाम, वाहन क्षेत्रानेही वाढीव मासिक कर्ज हप्त्याची अटकळ वर्तविल्याचा परिणाम शेअर बाजारात गेल्या सप्ताहअखेर दिसून आला होता. त्यातच आघाडीच्या वित्तसंस्थांनी चढय़ा महागाईमुळे रिझव्र्ह बँक वर्षअखेपर्यंत आणखी एकदा दरवाढ करेल, अशी भविष्यवाणी केल्याने सोमवारी एकाच व्यवहारात १.७९ टक्क्यांची घट नोंदवत सेन्सेक्स दिवसअखेर १९,९०१ वर येऊन ठेपला. शुक्रवारी सकाळच्या सत्रातच ६०० अंशांने आपटणारा सेन्सेक्स दिवसअखेर जवळपास ४०० अंशांचे नुकसान सोसता झाला होता. सोमवारीदेखील ३६२.७५ अंश नुकसान सेन्सेक्सने सोसले होते.
दिवसभरात ५,८७१.४० पर्यंत खाली आलेला निफ्टी दिवसअखेर १२२.३५ अंश घसरणीसह ५,८८९.७९ वर विसावला. त्यात शुक्रवारच्या व्यवहारातही शतकी घसरण झाली होती.
सेन्सेक्समधील २२ कंपनी समभागांमध्ये घसरण झाली. यामध्ये प्रामुख्याने बँक क्षेत्रातील समभागांचा समावेश होता. बँक निर्देशांक सर्वाधिक ४.४ टक्क्यांनी आपटला. एल अॅण्ड टी, मारुती सुझुकी, ओएनजीसी, रिलायन्स अशा बडय़ा कंपन्याही घसरणीत सहभागी झाल्या. तर डॉलरच्या तुलनेत व्यवहारात रुपया कमकुवत असूनही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना अधिक भाव मिळाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा