चालू वर्षांला निरोप देण्याचे दिवस जवळ आले असतानाच भांडवली बाजारांनी मंगळवारी एकाच दिवसात २०१४ मधील सर्वात मोठी आपटी नोंदविली. याचबरोबर सेन्सेक्सने २७ हजारांचा टप्पा तर निफ्टीने ८,१००चा स्तरही सोडला. मोदी लाटेवर डिसेंबरअखेर सेन्सेक्सच्या ३० हजारांचे बाजार विश्लेषकांचे मनसुबे या घसरणीने धुळीला मिळाले आहेत.
आठवडय़ातील दुसऱ्या सत्रात सेन्सेक्सने ५३८.१२ अंश तर निफ्टीने १५२ अंश घसरण नोंदविली. दोन्ही निर्देशांक अनुक्रमे २६,७८१.४४ व ८,०६७.६० वर बंद झाले. दोहोंतील घसरण जवळपास दोन टक्क्यांची राहिली.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति पिंप ६० डॉलरच्याही खाली येत असताना आणि भारतात डॉलरच्या तुलनेत रुपयाचा प्रवास गेल्या १३ महिन्यांच्या तळात होत असताना भांडवली बाजारातील घसरणीला जागतिक प्रमुख निर्देशांक आपटीची साथ मिळाली. परकीय चलन व्यासपीठावर मंगळवारच्या सत्रात डॉलरसमोर ६४ पर्यंत नांगी टाकणाऱ्या रुपयामुळे विदेशी गुंतवणूकदारांनीही भांडवली बाजारातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला. कच्च्या तेलाचा गेल्या सहा वर्षांतील नीचांक स्थानिक गुंतवणूकदारांमध्येही धडकी भरवून गेला.
नोव्हेंबरमधील किरकोळ तसेच घाऊक महागाई दर कमी नोंदला गेला असला तरी सोमवारी जाहीर झालेल्या गेल्या महिन्यातीलच वाढत्या व्यापार तुटीने बाजारात कमालीची अस्वस्थता निर्माण केली. सोने आयातीत सहा पट वाढीने दीड वर्षांच्या उच्चांकावर पोहोचलेल्या व्यापार तुटीने बाजारात समभागांची जोरदार विक्री होणे अपेक्षित ठरले.
सेन्सेक्समधील केवळ तीनच समभाग वधारते राहिले. उर्वरित २७ समभागांचे मूल्यही आपटले. यामध्ये सेसा स्टरलाइट, डॉ. रेड्डीज, हिंदाल्को, स्टेट बँक हे आघाडीवर राहिले. टाटा पॉवर, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, आयटीसी, टाटा स्टील, एचडीएफसी यांनाही घसरणीचा फटका बसला.
किरकोळ गुंतवणूकदारांचे आकर्षण असलेले स्मॉल (-३.३६%) व मिड (-२.९६%)कॅपही आपटले. मुंबई शेअर बाजारातील १२ पैकी १० क्षेत्रीय निर्देशांक घसरले. भक्कम अमेरिकी चलनामुळे महसूलवाढीच्या अपेक्षेने माहिती तंत्रज्ञान निर्देशांक मात्र वधारता राहिला. यामध्ये टीसीएसने ३.४० टक्के तर इन्फोसिसने ०.६९ टक्के वाढ नोंदविली.
सेन्सेक्सने यापूर्वी एकाच व्यवहारात सर्वात मोठी आपटी ६५१ अंशांची नोंदविली आहे. मात्र ती गेल्या वर्षांतील होती. ३ सप्टेंबर २०१३ नंतर बाजाराची मोठी आपटी २०१४ ची अखेर होण्याच्या टप्प्यात नोंदली गेली आहे.
तेलात घसरणीने जगभरात शेअर बाजारांची घसरगुंडी!
चालू वर्षांला निरोप देण्याचे दिवस जवळ आले असतानाच भांडवली बाजारांनी मंगळवारी एकाच दिवसात २०१४ मधील सर्वात मोठी आपटी नोंदविली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-12-2014 at 12:08 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex posts biggest fall this year