प्रति डॉलर ६० रुपयांपर्यंत विक्रमी गटांगळी खाणारे भारतीय चलन तसेच कालच्या भयाण आपटीने दोन महिन्यांच्या तळात गेलेला भांडवली बाजार शुक्रवारी मात्र सावरताना दिसला. कालच्या तुलनेत ३० पैशांनी भक्कम होत रुपया ५९.२७ पर्यंत सुधारला. तर भक्कम रुपयाकडे पाहून गुंतवणूकदारांनी समभागांमध्ये खरेदी खालच्या भावात करण्याची संधी साधली. परिणामी सेन्सेक्स सकारात्मक ५४.९५ अंश वाढीसह दिवसअखेर १८,७७४.२४ वर स्थिरावला. कमी भावात उपलब्ध माहिती तंत्रज्ञान, वाहन कंपन्यांच्या समभागांची खरेदी झाल्याने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील ११.७५ अंश वधारणेसह ५,६६७.६५ वर बंद झाला.
अमेरिकी फेडरल रिझव्र्हच्या अर्थउभारीचा रोखे खरेदीच्या कार्यक्रमाला वर्षअखेर आटोपत्या घेण्याच्या संकेतावर तीव्र प्रतिक्रिया म्हणून सेन्सेक्सने गुरुवारी एकाच व्यवहारात अडीच वर्षांतील सर्वात मोठी गटांगळी नोंदविली. पार १९ हजाराखाली दोन महिन्यांच्या नीचांकाला तो येऊन ठेपला. शुक्रवारी बाजाराचा सप्ताहाचा शेवटचा दिवस होता. दिवसाची सुरुवातही १८,६९५.८० अशा नरमाईने झाली. १८,६१५.१४ हा दिवसाचा नीचांकही त्याने सकाळच्या व्यवहारातच गाठला. दिवस सरत गेला तशी मात्र निर्देशांकात सुधारणा होत गेली. केंद्रीय अर्थव्यवहार समितीने घेतलेल्या काही निर्णयांचा तसेच रुपयातील घसरण रोखण्याबाबत रिझव्र्ह बँक निर्णय घेईल, या केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या आश्वस्त विधानाचा भांडवली बाजारावर परिणाम झाला.
वाहन, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, तेल व वायू क्षेत्रातील समभागांची या वेळी खरेदी झाली. सेन्सेक्समधील जवळपास निम्मे समभाग तेजीत होते. तर दरम्यानच्या काळात पोलाद, बांधकाम, ग्राहकोपयोगी वस्तू निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग मूल्य घसरले. रिलायन्स, स्टेट बँक, भेल, हिंदाल्को, जिंदाल स्टील हे नकारात्मक यादीत राहिले.
कालच्या व्यवहारात डॉलरच्या तुलनेत ५९.९८ पर्यंत जाणारा रुपया भांडवली बाजाराचे व्यवहार संपेपर्यंत शुक्रवारी सावरताना ५९.१४ पर्यंत वर आला होता.
रुपया गुरुवारच्या व्यवहारात ५९.९८ पर्यंत गेल्यानंतर दिवसअखेर ५९.५७ वर स्थिरावला होता. मात्र त्याचा सार्वकालिक नीचांक तरीही कायम होता. सप्ताहअखेर भारतीय चलन सुधारले आहे. दरम्यान रिझव्र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एच. आर. खान यांनीही रुपयाचे अवमूल्यन रोखण्यासाठी प्रसंगी आणखी उपाययोजना केल्या जातील, असे मुंबईत एका कार्यक्रमस्थळी स्पष्ट केले. बँका तसेच कंपन्यांनी डॉलरची विक्री केल्यानंतर तसेच केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतर रुपया सावरल्याचे मानले जात आहे.
नेव्हेलीतील निर्गुतवणुकीस मान्यता
सार्वजनिक क्षेत्रातील खनिकर्म तसेच ऊर्जा कंपनी असलेल्या नेव्हेली लिग्नाईटच्या निर्गुतवणुकीस अर्थव्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने शुक्रवारी मान्यता दिली. यानुसार कंपनीतील ५ टक्के हिस्सा विकून सरकारी तिजोरीत ४६६ कोटी रुपये जमा होण्याची शक्यता आहे. यासाठी खुल्या भागविक्रीची प्रक्रिया लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. तामिळनाडूस्थित कंपनीतील ७.८ कोटी समभाग विक्रीचा प्रस्ताव निर्गुतवणूक विभागाने सादर केला होता. या अगोदर समितीने चालू महिन्यातच याबाबतचा निर्णय नाकारला होता.
रुपया अन् शेअर बाजार झड-धक्क्यातून सावरले!
प्रति डॉलर ६० रुपयांपर्यंत विक्रमी गटांगळी खाणारे भारतीय चलन तसेच कालच्या भयाण आपटीने दोन महिन्यांच्या तळात गेलेला भांडवली बाजार शुक्रवारी मात्र सावरताना दिसला. कालच्या तुलनेत ३० पैशांनी भक्कम होत रुपया ५९.२७ पर्यंत सुधारला. तर भक्कम रुपयाकडे पाहून गुंतवणूकदारांनी समभागांमध्ये खरेदी खालच्या भावात करण्याची संधी साधली.
First published on: 22-06-2013 at 03:52 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex rebounds from two month lows infosys tcs shares gain