मुंबई शेअर बाजाराच्या दलाल स्ट्रीटने दोन दिवस आधीच बुधवारी दिवाळी उत्सवी उत्साह अनुभवला. रिझव्र्ह बँकेकडून अपेक्षित निराशा झाली असली तरी अमेरिकेची मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्र्हच्या आगामी दोन दिवस चालणाऱ्या बैठकीची फलश्रुती मात्र स्थानिक बाजारासाठी उपकारक ठरेल असे कयास बांधत, मुख्य निर्देशांक- सेन्सेक्सने २१,०३३.९७ अशा सार्वकालिक उच्चांकी वेस बुधवारी ओलांडली.
जगातील सर्वच प्रमुख बाजारांमध्ये फेडरल रिझव्र्हच्या दोन दिवसांच्या बैठकीतून द्रवतेला पूरक ठरणारा कौल येईल अशा आशेने बुधवारी तेजी दाखविली. त्याला पूरकता म्हणून स्थानिक बाजारात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी खरेदीत उत्साह कायम राखला. परिणामी अर्थव्यवस्थेतील रोकडवाढीला बळ देणाऱ्या रिझव्र्ह बँकेच्या दुसऱ्या तिमाही पतधोरण आढाव्यातील उपाययोजनांबाबत सकारात्मकता दाखवीत मंगळवारच्या सेन्सेक्सच्या ३५९ अंशांच्या सुसाट तेजीने आज शतकी वाढीसह आणखी पुढची पायरी गाठली. महिन्यातील शेवटचा गुरुवार असल्याने फ्युचर्स आणि ऑप्शन व्यवहारांच्या सौदापूर्तीचा उद्याचा दिवस पाहता गुंतवणूकदारांच्या ‘शॉर्ट कव्हरिंग’ पवित्र्यानेही तेजीत योगदान दिले. राष्ट्रीय बाजाराच्या निफ्टीनेही ३०.८० अंशांच्या वाढीसह ६,२५१.७० असा महत्त्वाचा टप्प्यावर दिवसअखेर विश्राम घेतला. बाजारात उत्साही वातावरण इतके बिनतोड होते की, घसघशीत तिमाही तोटा नोंदविणारा भारती एअरटेलचा समभाग हा सेन्सेक्समधील सर्वाधिक ६ टक्क्यांची वाढ दाखविणारा समभाग ठरला. आयटीसी आणि आयसीआयसीआय बँक या समभागांच्या भावांनी घेतलेली झेपही सेन्सेक्सला बळ देणारी ठरली. १३ क्षेत्रीय निर्देशांकापैकी ११ मध्ये उत्साही वाढ दिसली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा