जागतिक शेअर बाजाराच्या अनुकूलतेवर सप्ताहारंभी स्वार होत सेन्सेक्सने सोमवारी शतकी भर नोंदविली. मुंबई निर्देशांक १००.७८ अंशांची कमाई करीत १९३८७.५० वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३२.६५ अंश वाढीने ५,९०० च्या पुढे, ५,९०४.१० पर्यंत पोहोचला. भांडवली बाजाराने नव्या आठवडय़ाची सुरुवातच सकाळच्या सत्रात ५० अंश वाढीसह केली. निर्देशांकाची ही तेजी कायम असतानाच ग्राहकोपयोगी वस्तू निर्मिती क्षेत्रातील हिंदुस्थान युनिलिव्हरच्या १४.६५ टक्के वाढीने तिमाही नफ्याने गुंतवणूकदारांचे मनोबल आणखी उंचावले. (कंपनीचे समभाग मूल्यही दिवसअखेर ७.४४ टक्क्यांसह ४९७.६० रुपयांवर गेला.) एकूणच सेन्सेक्स दिवसभरात १९,४२८.९४ पर्यंत गेला. १९२८४.४० च्या दिवसाच्या नीचांकानंतर तो शुक्रवारच्या तुलनेत शतकी भर नोंदविता झाला. त्याचबरोबर हीरो मोटोकॉर्प, विप्रो, स्टरलाइट, आयटीसी हेही वधारले.
गेल्या पाच सत्रापासून अनिल धीरुभाई अंबानी – रिलायन्स समूहातील प्रमुख कंपन्यांमध्ये अन्य कंपन्या रस घेत असल्याच्या वृत्ताने येत्या काही दिवसांमध्ये या कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी खरेदीची संधी निर्माण होईल, असा अंदाज निधी कॅपिटलच्या उपाध्यक्षा व तांत्रिक विश्लेषक प्रवीणा रेडीज यांनी व्यक्त केला आहे.
बाजार बंद होण्यापूर्वी दोन तास आधी युरोपीय बाजारातूनही सकारात्मक सूर उमटले. इटलीतील नव्या सरकारची स्थापना व अमेरिकेतील औद्योगिक स्थितीत होत असलेली सुधारणा यापासून आशियातील सर्वच बाजारांनी प्रेरणा घेतली.

Story img Loader