अमेरिकेतील रोजगाराच्या आकडेवारीवर स्थानिक भांडवली बाजाराची भिस्त मंगळवारीही कायम राहिली. सोमवारच्या व्यवहारातही सेन्सेक्स किरकोळ अंश वाढीने किंचितसा उंचावला होता, तर मंगळवारी २८.९२ अंश घसरणीसह सेन्सेक्स २०,८६४.९७ पर्यंत घसरला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २.१५ अंश नुकसानासह ६,२०२.८० पर्यंत खाली आला. सुरुवातीच्या वधारणेनंतर बाजारात घसरण नोंदली गेली. मंगळवारी उशिरा जाहीर होणाऱ्या अमेरिकेच्या रोजगारविषयक आकडेवारीवर त्याचे सावध व्यवहार होत होते. दिवसभरात सेन्सेक्स केवळ १३९ अंशांच्या फरकात वर-खाली होताना दिसला.
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सलग तिसऱ्या दिवशी नोंदली गेली. १३ पैशांनी कमकुवत होत रुपया आता ६१.६५ पर्यंत येऊन ठेपला आहे. मंगळवारी रुपयाचा प्रवास ६१.५४ ते ६१.८३ असा राहिला. गेल्या तीन सत्रांत मिळून त्यात ४२ पैशांनी घट झाली आहे.

Story img Loader