गेल्या आठ सत्रांतील उच्चांकी दौड कायम ठेवणारा मुंबई निर्देशांक बुधवारी दिवसअखेर किरकोळ घसरणीने माघारी फिरला, तर नाममात्र निर्देशांक वाढीने निफ्टीची मात्र नव्या विक्रमाकडे कूच कायम राहिली.
बुधवारच्या व्यवहारात २९,७८६.३२ पर्यंत मजल मारणारा सेन्सेक्स दिवसअखेर ११.८६ अंशांनी घसरत २९,५५९.१८ पर्यंत खाली आला, तर ३.८० अंश वाढीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,९१४.३० पर्यंत पोहोचला. सत्रात निफ्टी ८,९८५.०५ पर्यंत गेला होता.
३० हजारानजीकचा प्रवास करणाऱ्या मुंबई शेअर बाजाराने गेल्या नऊ व्यवहारांत प्रथमच नकारात्मकता नोंदविली आहे. यापूर्वीच्या आठही व्यवहारांत त्याने निर्देशांक वाढीसह पाच सत्रांत उत्तरोत्तर विक्रम राखला आहे. सेन्सेक्सची या कालावधीतील वाढ २,२०० हून अधिक अंशांची राहिली आहे, तर सलग नऊ सत्रांतील निफ्टीची वाढ ६३६.७५ अंश राहिली. विक्रमी टप्प्यावरील बाजारात गुंतवणूकदारांच्या नफेखोरी धोरणामुळे प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी हालचाल नोंदली गेली नाही, तर अमेरिकेच्या फेडच्या बैठकीच्या अपेक्षित निर्णयाकडेही बाजाराचे सावध लक्ष दिसून आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा