जागतिक महासत्ता अमेरिकेत निर्माण झालेल्या आर्थिक कोंडीच्या पाश्र्वभूमीवर तेथील मध्यवर्ती बँक-फेडरल रिझव्‍‌र्हने मंदीतील अर्थव्यवस्थेला उभारीसाठी चालविलेल्या रोखे खरेदी व तत्सम द्रवतापूरक कार्यक्रमांपासून नजीकच्या काळात तरी माघार घेतली जाणार नाही, असे कयास बांधून स्थानिक शेअर बाजारातील गुंतवणूकदार मात्र हुरळला आहे. मंगळवारच्या शतकी उसळीनंतर, (बुधवारच्या सुट्टीपश्चात) गुरुवारच्या सलग व्यवहार सत्रात सेन्सेक्सने ३८४ अंशांची वाढ दाखवून याचा प्रत्यय दिला.
अर्थसंकल्पाला मंजुरी देणाऱ्या सहमतीसाठी ओबामा सरकारला विरोधकांबरोबर सामंजस्य करण्यात अपयश आल्याने अमेरिकेच्या सरकारी विभागांवर १ ऑक्टोबरपासून अंशत: टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. या घटनेचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या बऱ्या-वाईट परिणामांपेक्षा, फेडरल रिझव्‍‌र्हच्या रोखे खरेदी कार्यक्रम मागे घेण्याच्या पवित्र्याला मुरड बसेल, ही बाब स्थानिक भांडवली बाजाराच्या दृष्टीने दिलासा देणारी ठरली आहे. बाजारातील विदेशी वित्तसंस्थांकडून गुंतवणुकीचा ओघ नजीकच्या काळात आटणार नाही, असे अनुमान बांधत मंगळवारपासून बाजारात गुंतवणूकदारांकडून खरेदीला जोर चढला आहे. परिणामी डॉलरमागे रुपयाही भक्कम बनत असल्याचे दिसून आले.
एकुणात सकारात्मकतेपायी गुरुवारी व्यवहार बंद झाले तेव्हा सेन्सेक्स ३८४.९२ अंश (१.९७%) कमाईसह १९९०२.०७ अंशांवर, तर निफ्टी निर्देशांकाने १२९.६५ अंश (२.२४%) उसळून ५,९०९.७० अशी पातळी गाठली. रिझव्‍‌र्ह बँकेच्या व्याजदर वाढीच्या कठोर धोरणाने हिरमुसलेल्या बाजाराचे दोन्ही निर्देशांक नव्या घडामोडीने पुन्हा सप्टेंबरच्या अंतिम सप्ताहातील उच्चांकी पातळीकडे अग्रेसर झाले आहेत. गेल्या काही काळात तीव्र स्वरूपात रुपयाच्या अवमूल्यनामुळे सॉफ्टवेअर सेवा-निर्यातदार टीसीएस आणि इन्फोसिस यांचे सरलेल्या जुलै-सप्टेंबर तिमाहीतील वित्तीय कामगिरी चांगली राहील, या अपेक्षेने त्यांची जोरदार खरेदी झाली.
शिवाय सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये अर्थसंकल्पात तरतूद केलेले १४००० कोटींचे अतिरिक्त भांडवलीकरण सरकारकडून ताबडतोबीने केले जाणार असल्याने सरकारी बँकांच्या समभागांसह एकूण बँकिंग समभागांना बाजारात चांगली मागणी दिसून आली. बाजारात धातू निर्देशांक (३.९४%), खालोखाल बीएसई बँकिंग निर्देशांक (३.४१%), भांडवली वस्तू निर्देशांक (२.८२%), तेल व वायू निर्देशांक (२.४६%) अशी सर्वसमावेशक वाढ दिसून आली.
एनएसईवर पुन्हा ‘चूकभूल’ व्यवहार
मुंबई : बरोबर वर्षांपूर्वी ५ ऑक्टोबरला राष्ट्रीय शेअर बाजारात ‘एम्के ग्लोबल’ या दलाल पेढीकडून झालेल्या ‘मानवी चुकीने’ क्षणार्धात निफ्टी निर्देशांकाची उडालेली घसरण आणि त्यातून ओढवलेल्या नुकसानीची पुरती भरपाईही अद्याप झाली नसताना, जवळपास तसाच ‘चूकभुली’चा प्रकार गुरुवारच्या सौदा सत्रात सकाळी १०.२० वाजता घडताना दिसला. फरक इतकाच की यंदा घसरगुंडीऐवजी निफ्टी निर्देशांकाचे ऑक्टोबरच्या वायद्याचे (फ्युचर्स) भाव अकस्मात मोठी उसळी घेताना दिसले. त्या समयी ‘निफ्टी फ्युचर’ ५९००च्या पातळीवरून निमिषार्धात १०० अंशांनी (२.८७ टक्क्य़ांनी) उसळून ५९९६ वर पोहचला. लगोलग तो पुन्हा १.५ टक्के वधारणेच्या मूळ पातळीवरही आला. गेल्या वर्षी ५ ऑक्टोबरला निफ्टी निर्देशांकाने तब्बल ९०० अंशांच्या घसरणीसह खालचे सर्किट गाठले होते. गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकविणाऱ्या या घटनेसारखा प्रसंग पुन्हा येणार नाही म्हणून योग्य ते व्यवहार-प्रणालीत बदल आणि काळजी घेतली गेल्याचा दावा खुद्द राष्ट्रीय शेअर बाजार आणि सेबीनेही केला. परंतु वर्ष सरत नाही तोच पुन्हा घडलेल्या या प्रकाराबद्दल राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रवक्त्याने स्पष्टीकरणासाठी माध्यमांना सामोरे न जाणे पसंतच केले.
रुपया सात आठवडय़ांच्या उच्चांकावर
मुंबई : रुपया ७३ पैशांनी (१.१७ %) भक्कम होत गुरुवारी प्रति डॉलर ६१.७३ पर्यंत उंचावला. चलनाने गेल्या सात आठवडय़ांचा उच्चांकी टप्पा गाठला आहे. अमेरिकेत ताजा घडामोडींमुळे फेडरल रिझव्‍‌र्हची रोखे खरेदी तूर्त लांबण्याच्या आशेने परकी डॉलर कमकुवत बनले आहे. त्याचा परिणाम रुपया ६१च्या वर भक्कम होण्यावर झाला. गुरुवारच्या व्यवहारात रुपया दिवसभरात ६२.२२ ते ६१.६५ पर्यंत असा अधिक भक्कमतेसह वधारत राहिले. चलनाचा हा टप्पा १६ ऑगस्टनंतरचा वरचा टप्पा होता. त्या वेळी रुपया डॉलरच्या तुलनेत ६१.६५ दरम्यान प्रवास करत होता.

Story img Loader