आठवडय़ाची सुरुवात थेट सव्वाशेहून अधिक अंशाने करत मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने सोमवारी २७,५०० च्या पुढे गेला. सायंकाळी उशिरा जाहीर होणाऱ्या औद्योगिक उत्पादन व महागाई दराच्या आकडेवारीच्या प्रतिक्षेत खरेदीचे व्यवहार करताना मुंबई निर्देशांक सप्ताह उंचीवर पोहोचला. तर निफ्टीने ८,३०० चा स्तर पार केला.
१२६.८९ अंश वाढीमुळे सेन्सेक्स २७,५८५.२७ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३८.५० अंश वाढीने ८,३२३ वर पोहोचला. भांडवली बाजाराचा हा ५ जानेवारीनंतरचा सर्वोच्च टप्पा आहे. सेन्सेक्स गेल्या सलग तीन व्यवहारात ६७६ अंशांनी झेपावला आहे. व्यवहारात २७,५२३.८६ पर्यंत मजल मारणारा सेन्सेक्स सत्रात २७,३२३.७४ च्या खाली गेला नाही.
सोमवारी सायंकाळी नोव्हेंबरमधील औद्योगिक उत्पादन दर तसेच डिसेंबरमधील किरकोळ महागाई दर जाहिर होण्यापूर्वी बाजारात झालेल्या खरेदीच्या मोसमात भांडवली वस्तू, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांना अधिक मूल्य मिळाले.
सेन्सेक्समधील लार्सन अॅन्ड टुब्रो, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान यूनिलिव्हर, एचडीएफसी बँकेच्या समभागांना मागणी राहिली. तर कोल इंडिया, बजाज ऑटो, हिंदाल्को, रिलायन्स इंडस्ट्रिज, गेल इंडिया, भारत एअरटेल, हीरो मोटोकॉर्पमध्ये घसरण झाली. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये भांडवली वस्तू १.५ टक्क्य़ांने उंचावला.
सेन्सेक्समधील निम्मे समभागांचे मूल्य शुक्रवारच्या तुलनेत वाढले.
युरोपीय भांडवली बाजारांमध्येही अद्यापही चिंतेचे वातावरण असल्याने तेथील प्रमुख निर्देशांकांमध्ये घसरण नोंदली जात होती. तर आशियाई बाजारांमध्ये संमिश्र वातावरण होते. डिसेंबरमधील रोजगारवाढीचा कल समाधानकारक नसल्याने शुक्रवारी उशिरा अमेरिकेतील भांडवली बाजारांनी सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर घसरण नोंदविली होती.
रुपया महिन्याच्या उच्चांकावर
मुंबई : आठवडय़ाच्या सुरुवातीलाही स्थानिक चलनातील भक्कमता कायम दिसली. परकी चलन व्यवहारात डॉलरसमोर रुपया सोमवारी १६ पैशांनी उंचावत ६२.१६ या टप्प्यावर पोहोचला. चलनाचा हा महिन्यातील सर्वोच्च स्तर आहे. सप्ताह उंचीवर असणाऱ्या भांडवली बाजारात निधी ओतण्यासाठी आवश्यक भासणाऱ्या निधीपोटी बँक तसेच निर्यातदारांनी अमेरिकी चलनाची विक्री केली. चलनाचा यापूर्वीचा वरचा स्तर १० डिसेंबर रोजी ६२.०२ होता. सलग चार व्यवहारातील रुपयाची भक्कमता आता १४१ पैशांची झाली आहे. तर डॉलरच्या तुलनेत युरोची नऊ वर्षांतील नीचांकी अद्यापही कायम आहे. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची डेट बाजारातील खरेदी चलनाच्या सहाय्यास आली, असे मत व्हेरासिटी समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमित ब्रह्मभट यांनी व्यक्त केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा