स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर राबविले जात असलेल्या आर्थिक सुधारणांच्या लाटेवर येथील भांडवली बाजार गुरुवारी ऐतिहासिक उच्चांकावर स्वार झाला. अमेरिकी फेडरल रिझव्र्हने तिचे व्याजदर किमान स्तरावर ठेवल्यानंतर तसेच भारतातील बांधकाम क्षेत्रात १०० टक्के थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा विस्तारल्यानंतर सेन्सेक्स व निफ्टीला गुंतवणूकदारांनी सर्वोच्च टप्प्यावर नेऊन ठेवले. दोन महिन्यांतच प्रमुख निर्देशांकांनी नवे विक्रमी स्तर काबीज केले.
जवळपास अडीचशे अंश वाढीने सेन्सेक्स २७,३५० पर्यंत पोहोचला, तर जवळपास शतकी वधारणेने निफ्टी ८,१७५ नजीक पोहोचला. दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी व्यवहारात त्यांचा ८ सप्टेंबर रोजीचा विक्रमी टप्पा मागे टाकला. निफ्टी व्यवहारात ८,१८१.५५ पर्यंत, तर सेन्सेक्स २७,३९०.६० झेपावला. दिवसअखेर सेन्सेक्स बुधवारच्या तुलनेत २४८.१६ अंश वाढीसह २७,३४६.३३ वर, तर निफ्टी ७८.७५ अंश वधारणेने ८,१६९.२० पर्यंत गेला. सलग तीन दिवसांत मुंबई निर्देशांकात ६०० अंशांची भर पडली आहे.
सलग पाच व्यवहारांतील तेजीनंतर सप्ताहाची सुरुवात भांडवली बाजाराने घसरणीसह केली होती. त्यानंतर पुन्हा सलग दोन दिवस निर्देशांकात तेजी राहिली होती. गुरुवारी मात्र त्याने उसळीच घेतली. व्यवहाराची सुरुवात २७ हजारांच्या वर, २७,०९८.९४ याद्वारे वधारणेसह झाली. व्यवहारात त्याने यापूर्वीचा २७,३४५.९९ हा टप्पा मागे टाकत २७,३९०.६० पर्यंत मजल मारली. दिवसअखेरच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांची मालमत्ता महिन्यातील वायदापूर्तीच्या अखेरच्या दिवशी ९५.३५ लाख कोटींनी वधारली आहे. तर दोन्ही बाजारांनीही १० लाख कोटी अशी विक्रमी उलाढालही गुरुवारी नोंदविली.
निर्देशांकांच्या विक्रमी तेजीला बांधकाम क्षेत्राच्या १०० टक्क्य़ांपर्यंतच्या थेट विदेशी गुंतवणूक मर्यादावाढीचे चांगलेच पाठबळ मिळाले. त्याचबरोबर या क्षेत्रातील अनेक नियम शिथिल करण्याचा परिणाम आघाडीच्या स्थावर मालमत्तांचे मूल्य उंचावण्यावर झाला. डीएलएफ, यूनिटेक, एचडीआयएलसारख्या कंपन्यांच्या समभागांना ६ टक्क्य़ांपर्यंतचा अधिक भाव मिळाला. एकूण स्थावर मालमत्ता निर्देशांकही सर्वाधिक ३.४ टक्क्य़ांनी वधारला.
सेन्सेक्समधील रिलायन्स, इन्फोसिस, एल अॅण्ड टी, मारुती, एचडीएफसी बँक, हिंदाल्को, एचडीएफसी, गेल, डॉ. रेड्डीज, आयटीसी, एनटीपीसी, टीसीएस हे प्रमुख समभाग उंचावले. स्थावर मालमत्तेसह माहिती तंत्रज्ञान, ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील समभागांचेही मुंबई निर्देशांकाला उच्चांकापर्यंत नेण्यात योगदान लाभले. सर्व १२ क्षेत्रीय निर्देशांक चढय़ा क्रमात राहिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा