सलग तिसऱ्या सत्रात वाढ नोंदवत सेन्सेक्स बुधवारी गेल्या दोन आठवडय़ांच्या उच्चांकावर पोहोचला. मुंबई शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकात ३८.१८ अंश वाढ होऊन सेन्सेक्स दिवसअखेर २५,९१८.९५ वर बंद झाला. जुलैमधील वधारत्या महागाई आकडय़ाकडे दुर्लक्ष करत गुंतवणूकदारांनी माहिती तंत्रज्ञान, आरोग्यनिगा, तेल व वायू क्षेत्रातील समभागांची खरेदी केली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १२.५० अंश वधारणेसह ७,७३९.५५ वर स्थिरावला.
भांडवली बाजाराने सलग तिसऱ्या सत्रात वाढ नोंदविली आहे. मंगळवारी तर प्रमुख निर्देशांकाने एकाच सत्रातील १० आठवडय़ांतील सर्वात मोठी झेप नोंदविली होती, तर दोन्ही निर्देशांक त्याच्या आठवडय़ातील सर्वोच्च टप्प्यावर होते. बुधवारी बाजारात चढ-उताराचे चित्र होते. २५,८६१.४७ अशी किमान सुरुवात करणारा सेन्सेक्स व्यवहारात २५,७९१.७९ या दिवसाच्या नीचांकावरही येऊन ठेपला. दिवसअखेर मात्र त्यात मंगळवारच्या तुलनेत तेजी नोंदली गेली.
निफ्टीने मंगळवारीच ७,७०० चा टप्पा पार केला होता, तर सेन्सेक्स आता २६ हजारानजीक पोहोचला आहे. मुंबई निर्देशांक यापूर्वी ३० जुलै रोजी २६,०८७.४२ पर्यंत पोहोचला होता. तिन्ही सत्रांतील मिळून सेन्सेक्सची भर ५९० च्या पुढे राहिली आहे. बुधवारी रुपया डॉलरसमोर कमकुवत असूनही माहिती तंत्रज्ञान आणि आरोग्यनिगा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना भांडवली बाजारात मागणी राहिली. सेन्सेक्समधील १४ समभाग वधारले.

Story img Loader