सलग चौथ्या सत्रात वाढ नोंदविताना मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स या प्रमुख निर्देशांकाने किरकोळ वाढीसह सप्ताहअखेर तेजी कायम ठेवली. निवडक क्षेत्रीय समभागांमध्ये विदेशी निधीचा ओघ नित्य राहिल्याने मुंबई निर्देशांक ३८.७९ अंश वाढीसह आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी २०,२८६.१२ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १७.४० अंश वधारणेसह ६,१८७.३० पर्यंत पोहोचला.
सेन्सेक्समधील ३० पैकी १६ समभाग वधारले. त्यातही भेल या सार्वजनिक कंपनीचा समभाग गेल्या पाच महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला होता. शुक्रवारच्या सत्रात त्याला ४ टक्के अधिक भाव मिळत मूल्य २०१.३५ रुपयांवर पोहोचले. बँक समभागांना असलेली मागणी कायम आहे. आज आयसीआयसीआय बँक, भारतीय स्टेट बँक, अ‍ॅक्सिस बँक यांचे समभाग जवळपास दोन टक्क्यांपर्यंत वाढले. शिवाय बांधकाम निर्देशांकानेही २.०२ टक्क्यांची वाढ नोंदविली. लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो, इन्फोसिस यांचेही समभाग वधारले. बँक, बांधकाम क्षेत्रासह भांडवली वस्तू, ऊर्जा क्षेत्रातील समभागांनी मागणी नोंदविली आहे. प्राथमिक माहितीनुसार, भांडवली बाजारात गुरुवारच्या व्यवहारात विदेशी संस्थात्मक गुंकवणूकदारांचा निधी १,०७०.३३ कोटी राहिला आहे.
शुक्रवारअखेर बाजाराने गाठलेला टप्पा गेल्या अडिच वर्षांनंतरचा वरचा आहे. ५ जानेवारी २०११ रोजी सेन्सेक्स २०,३०१.१० वर होता. आशियाई, युरोपीय बाजारातील तेजीवरही स्थानिक भांडवली बाजाराची वाटचाल अवलंबून राहिली आहे. बाजाराची चढती कमान आगामी कालावधीतही कायम राहण्याची शक्यता आहे. रिझव्‍‌र्ह बँकेचे मध्य तिमाही पतधोरण १७ जून रोजी जाहिर होत आहे. महागाई कमी होत असल्याने यंदा किमान अध्र्या टक्क्याची व्याजदर कपात अपेक्षित आहे. गव्हर्नर सुब्बराव यांनीही घसरत्या महागाईला केंद्रस्थानी ठेवून आगामी पतधोरणाची वाटचाल असेल, असे व्याजदर कपातीबाबत सूचित केले आहे.
विदेशी गुंतवणूकदारांचा अंदाज $=रु=५५
विशेषत: व्याजदराशी निगडित समभागांची खरेदी करण्याचे धोरण अवलंबत भांडवली बाजारातील निधीचा ओघ कायम ठेवणाऱ्या विदेशी गुंतवणूकदारांनी डॉलरच्या तुलनेत रुपया ५५ ला स्पर्श करेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. येत्या सहा महिन्यांसाठी त्यांनी याची मुदत दिली वर्तवली आहे. चालू खात्यातील चिंताजनक तूट याकामी त्यांनी गृहीत धरली आहे. बार्कलेज या वित्तसंस्थेने विदेशी गुंतवणूकदारांचे मत लक्षात घेत याबाबतचे सर्वेक्षण केले आहे. देशातील प्रमुख क्षेत्रातील विदेशी गुंतवणूकदारांना यासाठी हेरण्यात आले आहे. पैकी ८८ टक्के गुंतवणूकदारांनी डॉलरच्या तुलनेत रुपया ५५ चा तळ गाठेल, असे म्हटले आहे.  मेच्या पहिल्या पंधरवडय़ात झालेल्या या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४० गुंतवणूकदारांपैकी ७० टक्के विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी त्यांनी यापूर्वीच भांडवली बाजारातील निधीचा ओघ वाढवल्याचे कबूल केले आहे. रोखे बाजारातील शिथिलता कायम राहिल्यास भांडवली बाजारातील विदेशी निधीचा ओघ अधिक विस्तारून चालू खात्यातील तूट कमी करण्यास साहाय्यकारी ठरू शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे. नवा निधी हा सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या एक टक्का हिस्सा राखू शकतो, असेही या गुंतवणूकदारांना वाटते.
एप्रिलमधील महागाई कमी झाल्याने उंचावलेल्या व्याजदर कपातीच्या आशेने गेल्या काही सत्रापासून वधारणेच्या यादीत आहे. अवघ्या चार सत्रातच तो ५९५ अंशांनी उंचावला आहे. गुरुवारीही मुंबई शेअर बाजार त्याच्या जानेवारी २०११ नंतरच्या उच्चांकी टप्प्यावर पोहोचला होता. तर आठवडय़ाभरात तो एक टक्क्याने वधारला आहे. ऑक्टोबर २०१२ नंतर बाजाराची ही वाटचाल प्रथमच तेजीत राहिली आहे.

Story img Loader