डिसेंबर महिन्याच्या अर्थात चालू वर्षांच्या अखेरच्या वायदा पूर्तीच्या दिवशी सेन्सेक्सने गेल्या दोन दिवसांनंतर वाढ दाखवीत २१ हजारापुढील मजल कायम राखली. दिवसभरात २१,१३५.८५ पर्यंत पोहोचणारा मुंबई निर्देशांक (मधल्या बुधवारच्या सुट्टीनंतर) मंगळवारच्या तुलनेत ४१.८८ अंशांनी वधारत गुरुवारअखेर २१,०७४.५९ वर बंद झाला. निफ्टीही १०.५० अंश वाढीने ६,२७८.९० वर पोहोचला.
आशियाई बाजारांतील तेजीच्या जोरावर मुंबई शेअर बाजाराने व्यवहाराची सुरुवात तेजीसह केली. गुरुवारचे व्यवहार हे डिसेंबरमधील वायदापूर्तीचे अखेरचे व्यवहार होते. तेव्हा गुंतवणूकदारांनी मंगळवारनंतरची घसरण मोडीत काढण्याचे धोरण अवलंबिले. सप्ताहारंभी सेन्सेक्समध्ये किरकोळ घट झाली होती. मंगळवारच्या किरकोळ घसरणीनंतर बुधवारी बाजारातील व्यवहार बंद होते.
सुरुवातीच्या वाढीसह सेन्सेक्स दिवसभरात २१,१३५.८५ या दिवसाच्या उच्चांकापर्यंत गेला. बँक, माहिती तंत्रज्ञान, तेल व वायू आदी क्षेत्रांतील समभागांना या वेळी मागणी होती. ऊर्जा क्षेत्रातील समभागांनाही अधिक मूल्य प्राप्त झाले. हा निर्देशांक एकूण १.०६ टक्क्यांनी उंचावला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ऊर्जेसह नऊ निर्देशांक वधारले. तर सेन्सेक्समधील निम्म्या समभागांना मागणी राहिली. व्यवहाराच्या मावळतीला सेन्सेक्सचा २१,०१३.१४ हा दिवसाचा तळ राहिला.
 वायदापूर्तीचा दिवस असला तरी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून फारसे व्यवहार गुरुवारी नोंदले गेले नाहीत. अनेक जागतिक शेअर बाजारांमध्ये सध्या सुट्टय़ांचे वातावरण आहे. बुधवारच्या ख्रिसमसपासून २०१३ अखेरच्या दिवसापर्यंत बाजारात विदेशी गुंतवणूकदारांचे अस्तित्व फारसे राहिल, याची शक्यता कमी आहे. वायदा पूर्तीचा महिन्यातील गुरुवारचा शेवटचा दिवस असला तरी २०१३ वर्षांसाठी अखेरचे सत्र येत्या मंगळवारी होणार आहे.
*रुपया पुन्हा ढेपाळला
गेल्या काही दिवसांपासून सावरणारे भारतीय चलन गुरुवारी पुन्हा डॉलरपुढे ढेपाळले. ३७ पैशांनी घसरत रुपया व्यवहाराखेर ६२.१६ पर्यंत आले. ख्रिसमसच्या सुटीपूर्वी सलग तीन दिवसांतील तेजीमुळे रुपया ६१.७९ या महिन्यातील वरच्या टप्प्यावर होता. दोन दिवसात ते २५ पैशांनी वधारले. रुपयाची गुरुवारच्या व्यवहाराची सुरुवातच ६१.८५ वर उत्तम झाली. दिवसभरात चलन ६२.१७ पर्यंत घसरल्याने व याच पातळीजवळ तो स्थिरावल्याने त्याची सुरुवात हीच व्यवहाराची वरची पातळी ठरली.