चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत ६१ पर्यंत घसरलेल्या रुपयाचा तणाव भांडवली बाजारात सप्ताहारंभीच दिसून आला. दिवसअखेर शुक्रवारच्या तुलनेत १७१.०५ अंश घसरण नोंदवत सेन्सेक्स १९,३२४.७७ पर्यंत रोडावला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५६.३५ अंश घसरणीसह ५,८११.५५ वर सोमवारअखेर स्थिरावला.
सकाळी प्रारंभीच रुपयातील घसरण ६१ च्याही खाली गेली अन् मुंबई शेअर बाजार उघडताच आपटीचे वातावरण पाहायला मिळाले. गेल्या सप्ताहअखेर १९,५०० नजीक असणारा सेन्सेक्स दिवसभरात १९,१८५.९२ पर्यंत घरंगळला.
ओएनजीसी, एचडीएफसी, टाटा मोटर्स, गेल, कोल इंडिया, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, टीसीएस, एचडीएफसी बँक, महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र, भारतीय स्टेट बँक असे सारे दिग्गज समभाग लोळण घेत होते. अशक्त रुपयामुळे विशेषत: बँक समभागांना मोठा फटका बसला. घसरणीतील रुपयामुळे रिझव्‍‌र्ह बँक व्याजदर कमी करण्याची शक्यता दुरावल्याच्या भीतीने बँकांचे समभाग मूल्य घसरले. त्याउलट रुपया घसरल्याने डॉलरमधील कमाई उंचावल्याने भांडवली बाजारात सॉफ्टवेअर सेवा निर्यातदार कंपन्यांचे समभाग ४ टक्क्यांपर्यंत उंचावले होते. हेक्झावेअर, एचसीएलचे समभाग ३ टक्क्यांपर्यंत वधारले, तर विप्रो, इन्फोसिसमध्येही १.५ टक्क्यांपर्यंतची वाढ नोंदली गेली.

Story img Loader