वाढत्या महागाईपुढे रिझव्र्ह बँकेच्या मंगळवारच्या पतधोरणात व्याजदर कपातीवाचून पर्याय नाही, या गुंतवणूकदारांच्या अंदाजाने मुंबई शेअर बाजार सप्ताहाच्या पहिल्या दिवशी शतकी घसरण नोंदविली. परिणामी, सेन्सेक्स सलग पाचव्या सत्रात नकारात्मक राहताना आता गेल्या दोन आठवडय़ांच्या तळाला येऊन पोहोचला आहे.
मुंबई निर्देशांक ११३.२४ अंश घसरणीसह २०,५७०.२८ वर, तर निफ्टी ४३.८० अंशाने खाली येत ६,१०१.१० वर स्थिरावला. गेल्या चारही व्यवहारांत प्रमुख भांडवली बाजाराने २१०.३७ अंश नुकसान सोसले आहे. रिझव्र्ह बँकेचे दुसऱ्या तिमाहीचे पतधोरण एक दिवसावर येऊन ठेपले असताना गुंतवणूकदारांनी व्याजदराशी निगडित समभागांची विक्री केली.
नव्या आठवडय़ाची सुरुवात करताना सेन्सेक्स सकारात्मक वाटचाल करत होता. या वेळी गेल्या चार व्यवहारांतील नकारात्मक प्रवासाकडे त्याने दुर्लक्ष केले होते. असे असताना दिवसभरात २०,७७१.३८ पर्यंत तो झेपावला. दिवसअखेर नफेखोरीचे वातावरण निर्माण होत सेन्सेक्स दोन आठवडय़ांच्या तळाला विसावला. सलग पाचव्या सत्रातील मिळून मुंबई निर्देशांकाची घट आता ३२४ अंश झाली आहे.
बाजारात व्यवहाराखेर स्टेट बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक यांच्या समभागांत मोठी घसरण झाली. याउलट एचडीएफसी, लार्सन अॅण्ड टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज यांना मागणी राहिली. घसरणीत सेन्सेक्समध्ये आयटीसीमध्ये वरच्या टप्प्यावर राहिला. तर बँक, बांधकाम निर्देशांक २ टक्क्यांपर्यंत घसरले.

रुपयात किरकोळ घट; सराफा बाजाराचा संमिश्र कल
मुंबई: गेल्या आठवडय़ाच्या अखेरचे सलग दोन दिवस वधारल्यानंतर रुपया सप्ताहअखेर ६१.४६ असा स्थिर होता. तथापि सोमवारी मात्र सप्ताहाच्या प्रारंभीच त्याने डॉलरपुढे घसरण दाखविली. दिवसअखेर काहीसा सावरून सहा पैशांनी खाली येत रुपया ६१.५२ पातळीवर रोडावला. तर मुंबईच्या सराफा बाजारात गेले काही दिवस भाव खाणारे सोन्याचे दर सोमवारी घसरले. त्या उलट चांदीचा भाव वधारला. १० गॅ्रमसाठी स्टँडर्ड सोने ७० रुपयांनी घसरून ३१,९४५ या शुक्रवारच्या स्तरावर आले, तर शुद्ध चांदीचा किलोचा भाव ९० रुपयांनी वधारून ५० हजार रुपयांपुढे ५०,६३० रुपयांवर गेला.

Story img Loader