सप्ताहारंभीच्या व्यवहारात उच्चांकापासून मागे खेचणाऱ्या निर्देशांकातील नफेखोरी मंगळवारी वाढताना दिसली. यामुळे सलग तीन दिवस वधारणारा सेन्सेक्स १६७.३७ अंशांनी घसरत २४,५४९.५१ पर्यंत आला. निफ्टीही ४१.०५ अंश घसरणीसह ७,३१८.०० वर येऊन ठेपला.
गेल्या तीन व्यवहारांत सेन्सेक्समध्ये ४१८.८६ अंश वाढ झाली होती. सोमवारी सेन्सेक्स २५ हजारांपर्यंत पोहोचला होता. व्यवहारअखेर त्याने २४,७१६.८८ हा नवा विक्रम स्थापित केला होता. निफ्टीला मात्र हे करता आले नाही.
मोदी मंत्रिमंडळातील सदस्यांना वाटप झालेल्या खात्याबाबत गुंतवणूकदारांनी काहीशी नाराजी व्यक्त केली. माहिती तंत्रज्ञान, पोलाद आणि आरोग्यनिगा वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरले होते. सेन्सेक्समधील एचडीएफसी, रिलायन्स, स्टेट बँक यांचे समभाग मूल्य कमी झाले.
रुपयाची दोन महिन्यांतील सर्वात मोठी आपटी
मुंबई: सलग तिसऱ्या सत्रात घसरणाऱ्या रुपयाने गेल्या दोन महिन्यांतील सर्वात मोठी आपटी मंगळवारी नोंदविली. डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलन ३३ पैशांनी रोडावत ५९.०४ या १५ मेनंतरच्या किमान पातळीपर्यंत आले. या दिवशी रुपया ५९.२९ होता. तर यापूर्वीची सर्वात मोठी घसरण २० मार्च रोजी ३९ पैशांची नोंदली गेली होती.