जागतिक भांडवली बाजारातील कुंद प्रवाह पाहता गुंतवणूकदारांच्या सावध पवित्र्याने उलाढाल संथ झालेल्या बाजारात, बाजारअग्रणी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागातील अडीच टक्क्यांची तेजी आणि पदार्पणात १५.४ टक्क्यांची मुसंडी मारण्याची कामगिरी करणाऱ्या जस्ट डायल लि.ची कामगिरी विशेष लक्षणीय ठरली. माफक मर्यादेतील वध-घट दिवसभर सुरू राहिलेले दोन्ही बाजार-निर्देशांक बुधवारअखेर मात्र सकारात्मक पातळीवर बंद झाले.
उल्लेखनीय बाब म्हणजे सकाळी लवकर सुरू झालेल्या प्रमुख आशियाई बाजारात मोठी पडझड आणि दुपारनंतर घसरणीनेच सुरू झालेल्या युरोपीय बाजार पाहता आपल्या बाजाराची कामगिरी उजवी ठरली. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांनी किंचित का होईना वाढ दाखविली आणि सलग तीन दिवस सुरू असलेल्या घसरणीला विराम दिला.
गुरुवारी होत असलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वीची उत्सुकता म्हणून गुंतवणूकदारांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांमध्ये मोठी खरेदी केली. परिणामी या समभागाचा भाव कालच्या तुलनेत २१.८० रुपये (२.७९%) वधारला.
केंद्रीय मंत्रिमंडळाने स्थावर मालमत्ता नियमन प्राधिकरणाच्या विधेयकाला मंगळवारी दाखविलेला हिरवा कंदीलाचे सुपरिणाम बाजारात दिसून आले. असा कायदा झाल्यास तो दीर्घ मुदतीत बांधकाम कंपन्यांसाठी फायद्याचा ठरेल, असे कयास बांधत या उद्योगातील समभागांनाही बाजारात मागणी दिसून आली. दिवसअखेर मंगळवारच्या तुलनेत माफक परंतु सकारात्मक वाढ नोंदवत, सेन्सेक्स २२ अंशांच्या कमाईसह १९५६८ तर निफ्टी ४ अंशांनी वाढून ५९२४ वर बंद झाला. त्या उलट जपानचा निक्केई ४ टक्के, तर सिंगापूरचा स्ट्रेट टाइम्स घसरणीसह बंद झाला.

Story img Loader