सलग पाच दिवसांच्या तेजीने गेल्या अडीच वर्षांच्या उच्चांकावर पोहचलेला ‘सेन्सेक्स’ बुधवारी बँक समभागांच्या विक्रीपायी घरंगळला. रिझव्‍‌र्ह बँकेने बँकांसाठी योजलेल्या कठोर उपाययोजनांची धास्ती घेत मुंबई निर्देशांक २११.४५ अंश घसरणीसह २०,०९०.६५ वर येऊन ठेपला. सेन्सेक्स २० हजारांच्या काठावर आला असतानाच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी’ही ८७.३० अंश घट झाल्याने ६ हजाराखाली रोडावला.
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने दुसऱ्यांदा केलेल्या उपाययोजना भांडवली बाजारातील बँक समभागांच्या मूल्यावर चांगलाच आघात करणाऱ्या ठरल्या. कमालीची रोकड चणचण आणि अल्प कालावधीसाठी चढे व्याजदर यांना सामोरे जावे लागणाऱ्या बँक समभागांची बुधवारी बाजारात सपाटून विक्री झाली. आयसीआयसीआय बँक, भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी बँक यांचे समभाग मूल्य दिवसअखेर तब्बल ४ टक्क्यांपर्यंत घसरले. व्यवहाराच्या सुरुवातीला आठवडय़ाच्या वरच्या टप्प्यावर पोहोचलेल्या रुपयाकडे दुर्लक्ष करीत बँक निर्देशांकही ४.६१ टक्क्यांनी आपटला. सेन्सेक्समधील बुधवारच्या द्विशतकी घसरणीने गेल्या सलग पाच सत्रांतील तेजीला खीळ घातली. पाचही दिवसांच्या व्यवहारात मिळून मुंबई निर्देशांकाने ४५१ अंशांची भर नोंदवीत ५ जानेवारी २०११ नंतरचा सर्वोच्च टप्पाही गाठला होता. आज मात्र एकाच सत्रातील घसरणीने गुंतवणूकदारांची मालमत्ताही ७८,००० कोटी रुपयांनी रोडावली.

Story img Loader