सलग पाच दिवसांच्या दमदार तेजीतून २० हजाराची पातळी सर करणाऱ्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ला गुरुवारी नफावसुलीचे ग्रहण लागल्याचे दिसून आले. अनेक आघाडीच्या समभागांमध्ये वरच्या पातळीवर विक्री करून गुंतवणूकदारांनी चांगला नफा वसूल केल्याचे दिसून आले.
सरकारच्या सांख्यिकी विभागाकडून जाहीर होणाऱ्या औद्योगिक उत्पादन तसेच किरकोळ महागाई आकडय़ांबाबत अनेक अर्थतज्ज्ञांमध्ये घेण्यात आलेल्या सर्वेक्षणांनी नकारात्मक कौल दिल्याने, त्या परिणामी भांडवली बाजारात नरमाईचे पडसाद दिसून आले. याच कारणाने चलन बाजारात रुपयाने डॉलरच्या तुलनेत कमजोरी दाखविली. त्यामुळे प्रारंभीच्या सत्रात ‘सेन्सेक्स’ने सर केलेली २० हजाराची पातळीही अल्पजीवी ठरली. तर याच पातळीपासून बाजारात विक्रीला जोर चढलेला दिसून आला. दिवसअखेर बाजाराच्या दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये प्रत्येकी १.१ टक्क्यांची घट दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्स २१५ अंशांनी घसरून १९७८१.८८ पातळीवर उतरले, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी’ ६२.४५ अंशांनी घसरून ५८५०.७० वर स्थिरावला.
तथापि, शेअर बाजारातील व्यवहार बंद झाल्यावर जाहीर झालेल्या औद्योगिक उत्पादनाच्या आकडय़ांनी सर्वच भाकितांना फाटा देत आश्चर्यकारक उभारी दाखवून दिली.
सेन्सेक्स-निफ्टी या प्रमुख निर्देशांकांमध्ये घसरण झाली असली, तरी स्मॉल आणि मिडकॅप समभागांमध्ये आज खरेदी दिसून आली आणि दोन्ही निर्देशांकांनी जवळपास पाऊण टक्क्यांची वाढ दर्शविली. त्या उलट आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी हे आघाडीचे समभाग प्रत्येकी दीड ते दोन टक्क्यांनी घसरले.
१२ पैशांच्या कमजोरीसह रुपयाची प्रति डॉलर ६३.५० पातळी
* रिझव्‍‌र्ह बँकेची गव्हर्नर म्हणून डॉ. रघुराम राजन यांनी ४ सप्टेंबरला पदग्रहण केल्यापासून सलगपणे मजबूत होत आलेल्या रुपयानेही आज प्रति डॉलर १२ पैशांची घसरण दाखवून ६३.५०च्या पातळीवर फेर धरला. आधीच्या सलग पाच व्यवहार झालेल्या दिवसांमध्ये स्थानिक चलनाने डॉलरच्या तुलनेत तब्बल ४२५ पैशांनी म्हणजे सुमारे ६.२८ टक्क्यांनी उसळी दाखविली आहे. अर्थात याच दिवसा भांडवली बाजारातील दमदार खरेदी आणि सातत्याच्या तेजीचीही साथ रुपयाच्या सुदृढतेला मिळाली आहे. तथापि गव्हर्नर राजन यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेतील विधानांनी सकारात्मक बनलेल्या बाजारभावनांनी त्याला हातभार लावला आहे. गुरुवारी मात्र आयातदारांकडून अमेरिकी डॉलरची वाढलेली मागणी आणि महागाई तसेच औद्योगिक उत्पादनाच्या आकडय़ांबाबत साशंकतेने नरमलेल्या भांडवली बाजाराने रुपयाला पुन्हा कमजोर केले. गुरुवारी सकाळच्या सत्रात ६३.२० म्हणजे बुधवारच्या तुलनेत प्रति डॉलर १८ पैशांच्या सरशीने सुरुवात करणारा रुपयाने तीन आठवडय़ांपूर्वीची म्हणजे ६२.९२ पातळीपर्यंत मजल मारली होती. परंतु दिवसभरात हा उत्साह उत्तरोत्तर सरत गेला आणि प्रत्यक्षात डॉलरमागे १२ पैशांचे नुकसान सोसत रुपया ६३.५० पातळीवर स्थिरावला.
निमशहरी दुकानदारांसाठी अनोखे ‘चॅनेल कार्ड’
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाने देशातील आघाडीची किरकोळ विक्री सेवा क्षेत्रातील कंपनी सुविधा इन्फोसव्‍‌र्ह प्रा. लि.च्या बरोबरीने एका संयुक्त प्रीपेड कार्डाचे गुरुवारी अनावरण केले. जेथे इंटरनेटची सोय नाही आणि बँकिंग सुविधाही नाही अशा निमशहरी भागात हे ‘चॅनेल कार्ड’ नामक प्रीपेड कार्ड जनसामान्यांना नजीकच्या सुविधा दालनांमध्ये विविध देयकांचा, करांचा भरणा करण्यासाठी तसेच तिकीटांच्या आरक्षणासाठी वापरता येईल. सेंट्रल बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव ऋषी यांच्या हस्ते आणि सुविधा इन्फोसव्‍‌र्हचे संस्थापक अध्यक्ष परेश राजदे आणि मास्टरकार्डचे दक्षिण आशिया क्षेत्राचे प्रमुक विकास वर्मा यांच्या उपस्थितीत चॅनेल कार्डचे अनावरण करण्यात आले. देशभरातील २८०० छोटी शहरे व नगरांमध्ये फैलावलेली सुविधाच्या ६५,००० दालनांचे चालक हे चॅनेल कार्डचे प्रमुख धारक असतील. हे अशा प्रकारचे ‘बी २ बी’ उलाढालीसाठी समर्पित पहिलेच कार्ड असल्याचे राजीव ऋषी यांनी यासमयी बोलताना सांगितले.

Story img Loader