गेल्या तीन सत्रांत जवळपास ५०० अंशांची वाढ नोंदवत २० हजारांपुढे राहिलेल्या सेन्सेक्सवर बुधवारी घसरत्या रुपयाचा दबाव दिसून आला. तीन व्यवहारांतील तेजी रोखताना मुंबई निर्देशांक १३.१८ अंश घसरणीसह २०,१४७.६४ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही ६.९५ अंश घट होऊन ६,१०४.३० वर समाधान मानावे लागले.
अमेरिकेसह जागतिक शेअर बाजारातील तेजीवर स्वार होत सेन्सेक्स दिवसभरात २०,२१६.४९ पर्यंत उंचावला होता. मात्र रुपयाने दिवसाच्या व्यवहारातच ५६चा तळ गाठल्याने भांडवली बाजारात चिंता व्यक्त करत गुंतवणूकदारांनी सेन्सेक्सला दिवसभरात २०,०४४.७४ पर्यंत खाली आणले. दिवसअखेर त्यात काहीशी सुधारणा होत मात्र मंगळवारच्या तुलनेत घसरण नोंदविली गेली.
किरकोळ घसरण नोंदविणाऱ्या सेन्सेक्समध्ये सन फार्मा, टाटा मोटर्स, हीरो मोटोकॉर्प, कोल इंडिया, सिप्ला हे समभाग वधारले तर स्टरलाइट, टाटा स्टील, जिंदाल स्टील, गेल इंडिया, आयसीआयसीआय बँक यांच्या समभागांचे मूल्य घसरले. क्षेत्रीय निर्देशांकामध्ये ग्राहकोपयोगी वस्तू, तेल व वायू निर्देशांक वधारले, तर घसरणीत ऊर्जा, बँक, बांधकाम, धातू हे समाविष्ट झाले.
भांडवली बाजाराचा येत्या दोन दिवसांचा प्रवास मुख्य घडामोडींवर अवलंबून असणार आहे. गुरुवारी महिन्यातील वायदापूर्तीचा अखेरचा दिवस आहे, तर शुक्रवारी गेल्या तिमाहीसह एकूण गेल्या आर्थिक वर्षांतील सकल राष्ट्रीय उत्पादनाचे आकडे जाहीर होत आहेत. देशाने जानेवारी ते मार्च २०१३ दरम्यान चालू खात्यातील तूटही सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या सर्वाधिक ६.७ टक्के नोंदविली आहे.

Story img Loader