अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्ह प्रमुखांच्या वक्तव्याने काही दिवसांपूर्वी भांडवली बाजाराला घेरी आली होती त्याच बेन बर्नान्के यांच्या आर्थिक उपाययोजना तूर्त कायम ठेवण्याच्या ‘समंजस पवित्र्या’ने सेन्सेक्सला जवळपास ४०० अंशांची झेप घेण्याचे बळ गुरुवारी दिले. आशियाई देशांसह जवळपास जगातील सर्वच भांडवली बाजार तेजीच्या प्रवासावर निघाले असताना, मुंबई निर्देशांकानेही १५ दिवसांत सत्रातील दुसरी मोठी झेप घेतली. तर निफ्टी महत्त्वपूर्ण ६,०००च्या उंबरठय़ावर पोहचला आहे. भांडवली बाजारावर मोठा परिणाम नोंदविणाऱ्या इन्फोसिसच्या तिमाही निकालाच्या पूर्वदिनी सेन्सेक्स ३८१.९४ अंश वाढीसह १९,६७६.०६ वर पोहोचला आहे. तर निफ्टी १४५.३६ अंश वधारणेसह ५,९३५.१० वर स्थिरावला आहे. भांडवली बाजारातील निधीचा ओघ परतू लागल्याचे चिन्हे असून दिवसातील भक्कम तेजीने गुंतवणूकदारही एक लाख कोटी रुपयांनी मालामाल बनले आहेत. फेडप्रमुख बेन बर्नान्के यांनी अर्थव्यवस्थेच्या सहकार्यार्थ उचलेली पावले आगामी कालावधीतही पडत राहतील, अशा समंजस पतधोरणाची कास धरण्याचे विधान केल्याने तमाम भांडवली बाजारात चैतन्य निर्माण झाले. आशियाई बाजार तेजीतच होता. युरोपीय बाजारानेही तोच क्रम राखत उत्साहवर्धक सुरुवात दाखविली.

दोन कंपन्यांच्या निर्गुतवणुकीला सरकारची मान्यता
स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशनसह (एसटीडी) भारतीय पर्यटन विकास महामंडळातील (आयटीडीसी) निर्गुतवणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी मान्यता दिली. या दोन्ही कंपन्यांमधील हिस्सा कमी करण्याच्या माध्यमातून सरकारला अवघे ३० कोटी रुपये प्राप्त होणार आहेत. उभय कंपन्यांमधील सरकारचा अनुक्रमे १.०२ व ५ टक्के हिस्सा कमी होणार आहे. एसटीसीत सरकारचा ९१.०२ टक्के तर आयटीडीसीत ९२.११ टक्के हिस्सा आहे.

नवे हवाई प्राधिकरण
भारतीय हवाई क्षेत्रासाठी नवे नागरी हवाई प्राधिकरण स्थापण्यात आले आहे. हवाई कंपन्यांचे नियमन होणाऱ्या नागरी हवाई महासंचलनालयाची जागा नवे प्राधिकरण घेईल. तिच्याकडे हवाई कंपन्यांचा दैनंदिन व्यवसाय, सुरक्षा, विमान वाहतूकीसह तिच्या वित्तीय बाबींवरही नियंत्रण असेल. या फेरबदलाचे विधेयक संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात येणार आहे. प्राधिकरणाला एक अध्यक्ष, एक महासंचालक व त्यावर पाच पूर्णवेळसह अन्य सात ते नऊ सदस्य असतील. नव्या प्राधिकरणाचा खर्च ११० कोटी रुपये असेल.

Story img Loader