अमेरिकी फेडरल रिझव्र्ह प्रमुखांच्या वक्तव्याने काही दिवसांपूर्वी भांडवली बाजाराला घेरी आली होती त्याच बेन बर्नान्के यांच्या आर्थिक उपाययोजना तूर्त कायम ठेवण्याच्या ‘समंजस पवित्र्या’ने सेन्सेक्सला जवळपास ४०० अंशांची झेप घेण्याचे बळ गुरुवारी दिले. आशियाई देशांसह जवळपास जगातील सर्वच भांडवली बाजार तेजीच्या प्रवासावर निघाले असताना, मुंबई निर्देशांकानेही १५ दिवसांत सत्रातील दुसरी मोठी झेप घेतली. तर निफ्टी महत्त्वपूर्ण ६,०००च्या उंबरठय़ावर पोहचला आहे. भांडवली बाजारावर मोठा परिणाम नोंदविणाऱ्या इन्फोसिसच्या तिमाही निकालाच्या पूर्वदिनी सेन्सेक्स ३८१.९४ अंश वाढीसह १९,६७६.०६ वर पोहोचला आहे. तर निफ्टी १४५.३६ अंश वधारणेसह ५,९३५.१० वर स्थिरावला आहे. भांडवली बाजारातील निधीचा ओघ परतू लागल्याचे चिन्हे असून दिवसातील भक्कम तेजीने गुंतवणूकदारही एक लाख कोटी रुपयांनी मालामाल बनले आहेत. फेडप्रमुख बेन बर्नान्के यांनी अर्थव्यवस्थेच्या सहकार्यार्थ उचलेली पावले आगामी कालावधीतही पडत राहतील, अशा समंजस पतधोरणाची कास धरण्याचे विधान केल्याने तमाम भांडवली बाजारात चैतन्य निर्माण झाले. आशियाई बाजार तेजीतच होता. युरोपीय बाजारानेही तोच क्रम राखत उत्साहवर्धक सुरुवात दाखविली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा