गेल्या तीन दिवसातील घसरण मोडून काढताना सेन्सेक्सने सप्ताहअखेरच्या व्यवहारात एकदम ५०० अंशांची उसळी घेतली. यामुळे मुंबई निर्देशांक पुन्हा २७ हजारावर जातानाच गेल्या दोन महिन्यातील सर्वोत्तम कामगिरी बजाविणारा ठरला.
सप्ताहअखेरच्या भांडवली बाजारातील तेजीमुळे गेल्या सत्रांपासून खरेदीसाठी लांब राहणाऱ्या विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा प्रवेश केला आहे. साप्ताहिक तुलनेतही सेन्सेक्स ९४ अंश वाढला आहे.
शुक्रवारच्या एकूण तेजीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही त्याचा ८,२०० चा टप्पा सत्रात पुन्हा एकदा गाठला. १३४.२० अंश वाढीसह निफ्टी ८,१९१.५० पर्यंत पोहोचला. सत्रात निफ्टी ८,२२४.९५ पर्यंत झेपावला होता.
गुरुवारी डॉलरच्या तुलनेत ६४ च्या घरात पोहचल्यानंतर बाजारात व्यक्त केलेली चिंता शुक्रवारी स्थानिक चलन पुन्हा ६३ नजीक स्थिरावल्याने नाहीशी झाली. याचबरोबर भारतीय रुपया त्याच्या गेल्या २० महिन्याच्या तळातूनही बाहेर आला.विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या करविषयक चिंतेबाबत मार्ग काढण्याचे सरकारने सुतोवाच केल्यानंतर बाजारानेही त्याचे स्वागत केले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी होत असल्याचा परिणामही निर्देशांकात भर घालण्यास निमित्त ठरला.
आठवडय़ातील शेवटच्या दिवसाचे व्यवहार सुरू करतानाच मुंबई शेअर बाजार तेजीत होता. याचवेळी त्याने त्याचा २७ हजार हा पल्ला पुन्हा गाठला. आणि तो लगेच २७,१९६.२८ या उंचावणाऱ्या टप्प्यावरही पोहोचला.
सेन्सेक्सने यापूर्वी सत्रातील मोठी तेजी ३० मार्च रोजी नोंदविली होती. यावेळी मुंबई निर्देशांकात एकाच दिवसात ५१७.२२ अंश भर पडली होती.
गेल्या सलग तीन व्यवहारातील मुंबई शेअर बाजाराचे नुकसान ८९१.४८ अंशांचे राहिले आहे. परिणामी सेन्सेक्स यामुळे २७ हजाराखाली, गेल्या साडे सहा महिन्याच्या तळात विसावला होता.
सेन्सेक्समध्ये टाटा मोटर्स, सिप्ला, आयसीआयसीआय बँक, हिंदाल्को, बजाज ऑटो, एचडीएफसी बँक, एचडीएफसी लिमिटेड, अॅक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रिज, टाटा पॉवर, हिंदुस्थान यूनिलिव्हर, लार्सन अॅन्ड टुब्रो, आयटीसी यांचे समभाग उंचावले. गुरुवारच्या सेन्सेक्समधील घसरणीत महत्त्वाची कामगिरी करणारे बँक समभागांचे मूल्य शुक्रवारी मात्र वाढले.
तर घसरलेल्या समभागांमध्ये नफ्यात १४ टक्के घसरण नोंदविणाऱ्या हीरो मोटोकॉर्पचा समावेश राहिला. कंपनी समभागाला २.२३ टक्के कमी भाव मिळाला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता निर्देशांक सर्वाधिक, ४.०६ टक्क्य़ांसह वाढला.
रुपया पुन्हा भक्कम
मुंबई : डॉलरच्या तुलनेत ६४ पर्यंत घसरणारा रुपया सप्ताहअखेर काहीसा सावरला. गेल्या २० महिन्याच्या तळातून बाहेर येताना तो शुक्रवारी २९ पैशांनी उंचावत ६३.९४ पर्यंत वधारला. गुरुवारी रुपया ६४.२३ पर्यंत घसरला होता. एकाच व्यवहारातील ६९ पैशांची आपटी नोंदविल्यानंतर स्थानिक चलन तब्बल १.०९ टक्के घसरणीसह गेल्या जवळपास दोन वर्षांच्या नीचांकावर पोहोचले होते. शुक्रवारच्या सत्रात ६३.१३ अशी भक्कम सुरुवात केल्यानंतर त्याने व्यवहारात ६३.९० पर्यंत झेप घेतली. अखेर त्याने तेजी नोंदविली. यापूर्वीच्या सलग पाच व्यवहारात रुपया १०८ पैशांनी घसरला होता.