देशांतर्गत नकारात्मकतेचा अव्हेर करीत विदेशातील सकारात्मक घडामोडींवर प्रतिक्रिया देण्याचे धोरण गुरुवारी भांडवली बाजाराने अनुसरले. अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हचा रोखे खरेदीचा स्थिर निर्णय व चीनमधील समाधानकारक निर्मिती क्षेत्राची वाटचाल याच्या जोरावर सेन्सेक्ससह निफ्टीतील गेल्या पाच दिवसांतील घसरणीला विराम मिळाला, इतकेच नव्हे तर या निर्देशांकांनी सुमारे दोन टक्क्यांची उसळीही घेतली.
दिवसभरात डॉलरच्या तुलनेत ६५च्याही खाली गेलेल्या रुपयाकडे दुर्लक्ष करत ४०७.०३ अंश वाढीसह मुंबई निर्देशांक पुन्हा १८ हजारापल्याड १८,३१२.९४ पर्यंत पोहोचला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत शतकी, १०५.९० अंश वाढ होत तो ५४०८.४५ वर गेला.
रोखे खरेदीचा कार्यक्रम गुंडाळण्याबाबत अमेरिकेच्या फेडरलने कोणतेही वक्तव्य केले नाही. तसेच शेजारच्या चीनमधील निर्मिती क्षेत्राची वाढही समाधानकारक राहिल्याचे स्पष्ट झाले. यामुळे सुरुवातीच्या घसरणीनंतर सेन्सेक्स दिवसभरात १८,३४९.८२ पर्यंत झेपावला. या आधी बुधवारी सलग पाचव्या सत्रात तब्बल १५०० अंशाच्या घसरणीने सेन्सेक्स १८ हजाराखाली रोडावला होता. परिणामी बुधवारी सेन्सेक्स ११ महिन्यांच्या नीचांकाला येऊन ठेपला होता. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी यावेळी ७९२.११ कोटी रुपयांची विक्री केली होती.
गुरुवारच्या ४०० अंशांची उसळी ही सेन्सेक्सची गेल्या दोन महिन्यांतील सर्वात मोठी उडी ठरली आहे. (यापूर्वी एकाच सत्रातील सर्वाधिक ५१९.८६ अंश वाढ २८ जून रोजी नोंदली गेली होती.) यामुळे गुंतवणूकदारांची मालमत्तादेखील १.१७ लाख कोटी रुपयांनी वाढली.
बाजाराला गुरुवारी पोलाद निर्देशांकाने ८.२३ टक्क्यांसह भरीव साथ दिली. त्याला या धातूचे सर्वात मोठा ग्राहक देश असलेल्या चीनच्या ऑगस्टमधील निर्मिती वाढल्याचे निमित्त मिळाले. पोलाद निर्देशांकातील हिंदाल्कोचे समभाग मूल्य ११ टक्क्यांनी उंचावले. त्याचबरोबर स्टरलाइट, टाटा स्टील या समभागांना चांगली मागणी राहिली. सेन्सेक्समधील २८ समभाग वधारले. केवळ एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक यांनाच आजच्या व्यवहारात नुकसान सोसावे लागले.
‘सेन्सेक्स’चे घसरत्या रुपयाकडे दुर्लक्ष
देशांतर्गत नकारात्मकतेचा अव्हेर करीत विदेशातील सकारात्मक घडामोडींवर प्रतिक्रिया देण्याचे धोरण गुरुवारी भांडवली बाजाराने अनुसरले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-08-2013 at 12:58 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex surged more than 2 2 percent 407 03 pts and nse nifty 2 percent 105 90 pts