वाढत्या महागाईच्या चिंतेने दिवसभर व्यवहारात चलबिचल दाखविणारा भांडवली बाजार बुधवारअखेर मात्र सकारात्मक राहत दोन आठवडय़ाच्या उच्चांकावर पोहोचला. सेन्सेक्स १३७.७५ अंश वाढीसह १९,३६७.५९ पर्यंत गेला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक निफ्टीही ४३ अंश भर घालून ५,७४२.३० वर गेला.
सोमवारच्या किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांकासह बुधवारी जाहीर झालेला घाऊक किंमत निर्देशांकदेखील महागाईत भर घालणारा स्पष्ट झाल्याने सेन्सेक्समधील व्यवहार दिवसभर चढ-उताराच्या फेऱ्यात अडकले. त्यामुळे गेल्या चार दिवसांतील बाजारातील तेजी थोपविली जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली. तीन दिवसात सेन्सेक्स ७०० अंशांनी अधिक वधारला आहे. बंद होताना मात्र सकारात्मकतेने सेन्सेक्स २९ जुलैनंतरच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला. वाहन क्षेत्रातील टाटा मोटर्ससह बजाज ऑटोलाही अधिक भाव मिळाला.
रुपया नव्या नीचांकाला
डॉलरच्या तुलनेतील रुपयातील नरमाई अद्यापही कायम आहे. बुधवारअखेर तर चलन कालच्या तुलनेत २४ पैशांनी घसरत ६१.४३ या नव्या नीचांकाला पार करते झाले. महागाई दर गेल्या पाच महिन्यांच्या वरच्या टप्प्याला पोहोचलेला पाहून रिझव्‍‌र्ह बँकेमार्फत अधिक रोकड टंचाईच्या उपाययोजनेच्या शंकेने परकी चलनाला अधिक मागणी आली. रुपयाने यापूर्वी ७ ऑगस्ट रोजी ६१.३० असा सार्वकालिक नीचांक गाठला होता.

Story img Loader