अमेरिकन चलनापुढे रुपयाचे ६४ रुपयांपर्यंत लोटांगण पाहता, व्यवहाराच्या सुरुवातीलाच १८ हजाराखाली आलेला भांडवली बाजार मंगळवारी दिवसअखेर बराच सावरला असला तरी सलग घसरणीचे सत्र मात्र कायम राहिले आहे. दिवसभरात ३३७ अंशांपर्यंत आपटी नोंदविल्यानंतर सेन्सेक्स व्यवहार बंद होताना ६१ अंशांच्या घसरणीसह १८ हजाराच्या वर, १८,२४६.०४ वर सावरला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १३.३० अंश घसरणीसह ५,४०१.४५ पर्यंत स्थिरावला.
चलन व्यवहारात सकाळच्या सत्रातच डॉलरमागे रुपया ६४ पर्यंत घसरल्याने भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांचाही निधी काढून घेण्याचा ओघ मोठय़ा प्रमाणात वाढला. याचा परिणाम सेन्सेक्स सकाळच्या सत्रातच ३३७ अंशांनी कोसळला. निर्देशांक १८ हजाराच्या खाली १७,९७१ पर्यंत रोडावला. याच समयी निफ्टीदेखील ५,४०० च्या खाली, ५,३७३ पर्यंत घसरला होता. दुपापर्यंत हे चित्र कायम होते. दिवसअखेरच्या टप्प्यात घसरण कमी होत गेली. मात्र व्यवहाराची अखेर त्याने घसरणीसहच कायम ठेवली.
गेल्या तीन व्यवहारात सेन्सेक्स १९,३०० वरून थेट १८,२०० वर आला आहे. मुंबई निर्देशांकातील या कालावधीतील अंशांमधील घसरण १,१०० अंशांची आहे. तर कालच्या व्यवहारातही विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी ६८०.०८ कोटी रुपये काढून घेतले. १८ हजारातील सेन्सेक्सचा तळदेखील सप्टेंबर २०१२ नंतर प्रथमच गाठला गेला आहे. निफ्टी दिवसअखेर ५,४०० वर बंद झाला असला तरी त्याचा हा गेल्या वर्षभरातील नीचांक आहे.
सेन्सेक्समधील ३० पैकी १६ समभाग घसरले. विद्युत उपकरण निर्देशांकाला सर्वाधिक ३.५४% फटका बसला. अमेरिकन, युरोपीय तसेच आशियातील अन्य प्रमुख बाजारांमध्येही घसरणीचेच वातावरण अद्याप कायम आहे.
बाजारात घसरण कायम
अमेरिकन चलनापुढे रुपयाचे ६४ रुपयांपर्यंत लोटांगण पाहता, व्यवहाराच्या सुरुवातीलाच १८ हजाराखाली आलेला भांडवली बाजार मंगळवारी दिवसअखेर बराच सावरला असला तरी सलग घसरणीचे सत्र मात्र कायम राहिले आहे.
First published on: 21-08-2013 at 12:55 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex trims early losses ends 61 pts lower as indian rupee remains weak