सलग पाच दिवसांच्या विश्रांतीने सुरू होणारा भांडवली बाजार मंगळवारी एकदम दोन महिन्यांच्या नीचांकाला येऊन ठेपला. सप्ताहाअखेरपासून सुरू होणाऱ्या कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या हंगामामुळे गुंतवणूकदारांमध्ये धास्ती निर्माण झाली. परिणामी, सेन्सेक्स एकाच व्यवहारात जवळपास ३०० अंशांनी आपटत २६,३००च्याही आत विसावत गेल्या दोन महिन्यांच्या तळाला आला. दिवसअखेर २९६.०२ अंश घसरणीसह मुंबई निर्देशांक २६,२७१.९७ पर्यंत थांबला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये ९३.१५ अंश घसरण होत निर्देशांक ७,८५२.४० वर बंद झाला.
सार्वजनिक व शनिवार, रविवारची सुटी यामुळे २ ऑक्टोबरपासून प्रमुख भांडवली बाजारात व्यवहार बंदच होते. मात्र नव्या सप्ताहाची सुरुवात करतानाच सेन्सेक्सने सकाळच्या सत्रात १३७ अंशांची घसरण राखली. बाजार या वेळी २६,५००च्याही खाली आला. व्यवहारात त्याचा किमान स्तर २६,२५०.२४ राहिला. १० ऑक्टोबरपासून इन्फोसिसच्या रूपाने सुरू होणाऱ्या दुसऱ्या तिमाहीच्या वित्तीय निष्कर्षांतील संभाव्य तुटीच्या आकडय़ाबाबत चिंता व्यक्त करत बाजाराने मंगळवारचा प्रवास नोंदविला. त्यातच मिड व स्मॉल कॅप मात्र पुन्हा घसरणीला येऊ लागले आहेत.
सेन्सेक्समधील हिंदाल्को, सिप्ला, डॉ. रेड्डीज् लॅब, एचडीएफसी, एनटीपीसी, गेल हे ४.३५ टक्क्यांपर्यंतच्या घसरणीसह आघाडीवर राहिले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये २.६५ टक्के नकारात्मक वाटचाल नोंदविणाऱ्या पोलाद निर्देशांकाचा क्रम अग्रभागी होता. पाच दिवसांच्या सुटीपूर्वी, १ ऑक्टोबरला सेन्सेक्सने ६२.५२ अंश घसरण नोंदविली होती. तर विदेशी गुंतवणूकदारांनी ६३.२४ कोटी रुपयांचे समभाग या दिवशी विकले होते. आता मंगळवारच्या घसरणीमुळे सेन्सेक्सने १४ ऑगस्टचा स्तर राखला आहे.
युरो झोनमधील जर्मनीने ऑगस्टमध्ये मोठी औद्योगिक उत्पादन घसरण नोंदविल्यानंतर या भागातील जर्मनीसह फ्रान्स, ब्रिटनमधील प्रमुख निर्देशांक १.०९ टक्क्यांपर्यंत घसरले. तर आशियाईतील जपान, सिंगापूर, तैवान येथील बाजारांमध्ये घसरणीचे वातावरण होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा