सोमवारच्या नकारात्मक प्रवासानंतर भांडवली बाजाराने पुन्हा त्याचा पूर्वीचा स्तर पादाक्रांत केला आहे. सेन्सेक्समध्ये मंगळवारी १२७.९२ अंश भर पडल्याने मुंबई निर्देशांक २६,८८०.८२ या महिन्याच्या उच्चांकावर विराजमान झाला. तर ३५.९० अंश वाढीमुळे निफ्टीने त्याचा आठ हजाराचा टप्पा पुन्हा गाठला. ०.४५ टक्के वाढीसह राष्ट्रीय शेअर बाजाराचा हा प्रमुख निर्देशांक ८,०२७.६० वर पोहोचला.
जुन्या – नव्या संवत्सराच्या अखेर-प्रारंभाला तेजीसह प्रवास करणारा सेन्सेक्स सोमवारी सप्ताहारंभी जवळपास शतकी घसरणीने खाली आला होता. यामुळे सलग पाच सत्रांतील तेजीही निमाली होती. तर निफ्टीही त्याच्या आठ हजाराच्या टप्प्याखाली आला होता. तत्पूर्वी दोन्ही प्रमुख निर्देशांक हे महिन्याच्या उच्चांकाला होते.
मंगळवारच्या व्यवहाराची सुरुवात सेन्सेक्सने २६,७८८.७३ या वाढीसह केली. मात्र दुपारपूर्वीच निर्देशांक २६,७६४.१५ या दिवसाच्या नीचांकापर्यंत खाली आला. यानंतर बाजारात पुन्हा वधारणेचे चित्र दिसले. त्यामुळे सत्राची अखेर करण्यापूर्वी सेन्सेक्सने २६,९०७.१४ या व्यवहाराच्या उच्चांकापर्यंत मजल मारली. सोमवारच्या तुलनेत मुंबई निर्देशांक १२७.९२ अंश वाढीसह २६,८८०.८२ वर बंद झाला.
तेजीमुळे निफ्टीनेही त्याचा आठ हजारावरील टप्पा पुन्हा गाठला आहे. तर सेन्सेक्सने महिन्याच्या उच्चांकाचा स्तर परत मिळविला. मंगळवारपासून सुरू होत असलेल्या फेडरल रिझव्‍‌र्हच्या पतधोरण बैठकीत व्याजदर कोणतेही फेरबदल न केली जाण्याची आशा असल्याने स्थानिक बाजारातही बँक समभागांना मागणी राहिली. सन फार्मा, सिप्ला, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, टाटा पॉवरही वधारले.
सेन्सेक्समधील १७ समभाग उंचावले. तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये आरोग्यनिगा सर्वाधिक १.४२ टक्क्यांनी वधारला. पाठोपाठ ग्राहकोपयोग वस्तू, बँक, भांडवली वस्तू निर्देशांकाची तेजीची कामगिरी राहिली. आंतरराष्ट्रीय बाजारात उतरलेल्या कच्च्या तेलाच्या दराचा तसेच कंपन्यांच्या वधारत्या तिमाही निकालानेही बाजारात उत्साह संचारला.

Story img Loader