सलग तीन सत्रातील घसरणीसह गेल्या दोन महिन्याच्या नीचांकातून बाहेर येताना मुंबई शेअर बाजार सप्ताहअखेर चांगलाच बरसला. डॉलरच्या तुलनेत पुन्हा भक्कम होऊ पाहणारे स्थानिक चलन आणि मेमधील घाऊक किंमत निर्देशांक अर्थात महागाई दर नरमल्याने व्याजदर कमी होण्याच्या आशेने गुंतवणूकदारांनी सेन्सेक्सला पुन्हा १९ हजारावर नेऊन ठेवले. एकाच सत्रात ३५०.७७ अंशांची मजल मारताना मुंबई निर्देशांक १९,१७७.९३ पर्यंत झेपावला.
भारतीय रिझव्र्ह बँकेचे मध्य तिमाही पतधोरण सोमवारी, १७ जून रोजी जाहिर होत आहे. यंदा व्याजदर कपातीला वाव मिळावा, असे मेमधील महागाईचे घसरते आकडेही शुक्रवारी स्पष्ट झाले. खुद्द केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही व्याजदर कपातीसाठी मध्यवर्ती बँकेवर दबाव आणण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे व्याजदर कपातीसाठी आधीच प्रतिक्षित असलेल्या उद्योग क्षेत्राचीही उत्सुकता ताणली गेली आहे. याचे परिणाम भांडवली बाजारावरही सप्ताहअखेर दिसून आले. गुंतवणूकदारांनी सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी समभागांची जोरदार खरेदी चालविली. सर्व १३ क्षेत्रीय निर्देशांकांना त्यांनी सकारात्मकता नोंदविण्यास भाग पाडले. तेही एकाच व्यवहारात ९० हजार कोटी रुपयांनी मालामाल झाले.
आठवडाभर अशक्त बनत चाललेल्या रुपयामुळे भांडवली बाजारानेही ६१३.७७ अंशांचे नुकसान सोसले आहे. असे करताना सेन्सेक्स गेल्या दोन महिन्याच्या नीचांकाची नोंद करतानाच १९ हजाराच्याही खाली गेला होता. शुक्रवारी सुरुवातीपासूनच बाजाराची वाटचाल तेजीच्या दिशेने सुरु होती. सकाळच्या व्यवहारातच सेन्सेक्स १९ हजाराच्या दिशने निघाला. यावेळी तो १८,९५९.८३ वर होता. जागतिक शेअर बाजारातील अनेक प्रमुख निर्देशांकाच्या जोरावर प्रमुख मुंबई निर्देशांक दिवसभरात १९,२१३.१० पर्यंत स्वार झाला होता. महागाईचे नरम आकडे जाहिर होतातच त्याने दिवसअखेरही त्याचे स्वागत गुरुवारच्या तुलनेत १.८६ टक्के वाढीसह केले.
राष्ट्रीय शेअर बाजारातही शतकी वाढ नोंदली गेली. १०९.३० अंश भर टाकत निफ्टी ५,८०८.४० पर्यंत पोहोचला. तर एमसीएक्स-एसएक्सचा एसएक्स-४० निर्देशांक २०७.०९ अंश वाढीसह ११,३८६.४५ पर्यंत पोहोचला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा