महिन्याच्या शेवटच्या दिवशी भांडवली बाजार माफक का होईना सलग सहाव्या दिवशी घसरण कायम राखत बुधवारी बंद झाला. उल्लेखनीय बाब म्हणजे सेन्सेक्सने दिवसभरातील मोठय़ा घसरणीतून लक्षणीय कलाटणी घेत केवळ २.६४ अंश घसरणीसह १९,३४५.७० पातळीवर विराम घेतला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ‘निफ्टी’त तुलनेने अधिक, १३.०५ अंशाची घट होऊन तो ५,७४२ वर स्थिरावला.
देशात बिघडत चाललेल्या अर्थस्थितीचा बाजारावरील ताण स्पष्टपणे जाणवत असून, विदेशी वित्तसंस्थांचे वेगाने सुरू असलेल्या पलायनाचा अनेक छोटय़ा-बडय़ा समभागांना जबर फटका बसताना दिसत आहे. जून आणि जुलै या दोन महिन्यांत विदेशी वित्तसंस्थांकडून तब्बल १७,००० कोटी रुपयांच्या समभागांची विक्री झाल्याचे अंदाज आहेत. तर गेल्या सहाही सत्रातील घसरणीमुळे मुंबई सेन्सेक्स ९५५ अंशांनी रोडावला आहे.
बुधवारी बाजारात व्यवहार सुरू असताना डॉलरच्या तुलनेत ६०.२० पर्यंत घसरलेल्या रुपयाचा चांगलाच दबाव निर्माण झाला होता. परिणामी बँका, बांधकाम क्षेत्र, ऊर्जा क्षेत्रातील समभागांच्या मूल्यात लक्षणीय घसरण झाली. त्या उलट वधारत्या डॉलरमुळे निर्यातप्रधान माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग तेजीत होते. आधीच बेभवरशाचे अर्थकारण त्यातच निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय अस्थिरतेची जोखीम बाजाराच्या जिव्हारी येताना दिसत आहे.

Story img Loader