नैगर्सिक वायूच्या किमती दुपटीने वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाने शुक्रवारी शेअर बाजाराच्या तेजीत चांगलेच इंधन भरले. जवळपास दोन वर्षांच्या कालावधीनंतर प्रथमच तब्बल ५२० अंशांची दमदार उसळी सेन्सेक्सने घेतली, इतकेच नव्हे १० दिवसांपूर्वी गमावलेली १९,००० ची पातळी पुन्हा सर केली. दुसरीकडे रुपयानेही डॉलरच्या तुलनेत ८० पैशांची भक्कम कमाई करीत, भावनिकदृष्टया महत्त्वाची साठीच्या आतील पातळी गाठली.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील दीडशेहून अधिक अंशांनी वधारत ५,८५० नजीक जाऊन पोहोचला.
गुरुवारी ३०० हून अधिक अंशांची सेन्सेक्सची कमाई आणि लगोलग सकाळी बाजार उघडल्यापासून सेन्सेक्स ५२० अंशांपर्यंत कायम ठेवलेली चढती कमान, ही केंद्र सरकारने आर्थिक सुधारणा पुढे रेटण्याबाबत दाखविलेल्या निर्धाराचे प्रत्यंतर आहे. एकूण बाजारासाठी भयंकर वादळी ठरलेल्या जून तिमाहीची अखेर सेन्सेक्स आणि निफ्टी या निर्देशांकांनी सणसणीत ५१९.८६ अंश (२.७५%) तर १५९.८५ अंशांनी (२.८१%) करणे ही बाब हवालदिल गुंतवणूकदारांना सुखद धक्का देणारीच ठरली. शुक्रवारच्या बहारदार तेजीने एकाच दिवसात गुंतवणूकदारांची मालमत्ताही १.५२ लाख कोटी रुपयांनी वाढली. सेन्सेक्स १४ महिन्यांपूर्वी म्हणजे २९ ऑगस्ट २०११ रोजी सर्वाधिक ५६७.५० अंशांनी वाढला होता.
कालच्या प्रमाणेच आजही डॉलरच्या तुलनेत रुपया ६० च्या आत सावरत असल्याचे पाहून बाजारातील उत्साहाला आणखीच स्फुरण दिले. सेन्सेक्समधील सर्व ३० कंपन्यांचे समभाग वधारणेच्या यादीत होते. तेल व वायूसह पोलाद, ऊर्जा निर्देशांकातही ४.७ टक्क्यांपर्यंत वधारले होते. सर्व १३ क्षेत्रीय निर्देशांकही उंचावले होते.

Story img Loader