चार महिन्यांतील सर्वोत्तम झेप घेत भांडवली बाजारांनी गुरुवारी एकाच सत्रात दोन टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविली. भारत दौऱ्यावर असलेल्या चीनच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर झालेल्या आर्थिक कराराला पसंती दर्शवीत गुंतवणूकदारांनी सेन्सेक्स तसेच निफ्टीला दीड महिन्याच्या उच्चांकाला नेऊन ठेवले. यामुळे मुंबई निर्देशांकाने भावनिक महत्त्वाचा २७ हजारांचा, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने त्याचा ८,१०० वरील टप्पा पुन्हा गाठू शकला.
गुरुवारच्या सत्रात २७,१३२.२० पर्यंत उंचावल्यानंतर सेन्सेक्स बुधवारच्या तुलनेत ४८०.९२ अंश वधारणेसह २७,११२.२१ वर पोहोचला, तर निफ्टीत १३९.२५ अंश भर घालत निर्देशांक ८,११४.७५ पर्यंत गेला. ८ हजारांवरील निफ्टीची सत्रातील वाढ ८,१२०.८५ पर्यंत होती. सेन्सेक्स, निफ्टीने यापूर्वी एकाच व्यवहारातील सर्वाधिक अंश वाढ १२ मे रोजी नोंदविली होती. याच दिवशी केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणीत आघाडी सरकार येणार याबाबतचे मतदानपूर्व सर्वेक्षण जाहीर झाले होते.
अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हने व्याजदर स्थिर ठेवल्याचे बाजारातील विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी स्वागत केले. तसेच चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीत भारत-चीनदरम्यान पाच वर्षांसाठी झालेल्या १०० अब्ज डॉलरहून अधिकच्या कराराबद्दलही बाजारात समाधान व्यक्त झाले. सेन्सेक्सचा दिवसातील नीचांकही २६,५०० च्या वरच राहिला.
मुंबई शेअर बाजारातील सर्व १२ क्षेत्रीय निर्देशांक वधारले. त्यांच्यात तब्बल ४.६५ टक्क्यांपर्यंतची उडी नोंदली गेली. त्यातही बांधकाम, ग्राहकोपयोगी वस्तू, भांडवली वस्तू, वाहन, ऊर्जा, बँक क्षेत्र आघाडीवर राहिले. सेन्सेक्समध्ये हीरो मोटोकॉर्प, एचडीएफसी, टाटा मोटर्स, लार्सन अॅन्ड टुब्रो यांचे समभाग अधिक वधारले.
सेन्सेक्स, निफ्टी पुन्हा त्याच्या अनुक्रमे २७ हजार व ८,१०० वर पोहोचतानाच प्रमुख निर्देशांकांनी त्यांच्या यापूर्वीच्या एकाच दिवसातील विक्रमाच्या नजीक जाणे पसंत केले. सेन्सेक्सने १२ मे रोजी सत्रात ५५६.७७ अंश, तर निफ्टीने १५५.४५ अंश वाढ नोंदविली होती. सेन्सेक्समधील केवळ इन्फोसिस व हिंदुस्थान युनिलिव्हरच नकारात्मक यादीत विसावले.
रुपयाला भक्कमता
मुंबई : सलग तिसऱ्या व्यवहारात उंचावताना भारतीय चलन गुरुवारी डॉलरच्या तुलनेत ८ पैशांनी वधारत ६०.८४ पर्यंत गेले. चलनाचा सत्रातील प्रवास ६१.०९ या नीचांकापासून सुरू झाला. बुधवारच्या ६०.९२ या टप्प्यानंतर रुपया सत्रात ६१.२० या महिन्याभराच्या तळातही रुतला. अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हने शून्य टक्क्याच्या जवळपासचे व्याजदर स्थिर ठेवल्याने रुपयाला मजबूती आली. आठवडाभर आधी मात्र डॉलर भक्कम बनल्याने रुपयाच्या हालचालीवर चिंता निर्माण झाली होती, गुरुवारच्या व्यवहारात ६०.८३ पर्यंत मजल मारल्यानंतर दिवसअखेर चलन ०.१३ टक्क्यांनी वधारले. गेल्या तिन्ही सत्रांत मिळून रुपयाची वाढ २९ पैशांची राहिली आहे.
तेजीवाल्यांची नंदीगर्जना
चार महिन्यांतील सर्वोत्तम झेप घेत भांडवली बाजारांनी गुरुवारी एकाच सत्रात दोन टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविली.

First published on: 19-09-2014 at 04:41 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse sensex zooms over 480 pts to close at 27112 nifty reclaims 8k level