नव्या महिन्यातील वायदापूर्तीच्या व्यवहारांची सुरुवात तेजीसह करताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दीडशेहून अधिक अंशवाढीने २६,४०० नजीक पोहोचला, तर अर्धशतकी निर्देशांक भर पडल्याने राष्ट्रीय शेअर बाजारालाही ८ हजारांचा पल्ला सप्ताहअखेर विनायासे गाठता आला.
गुरुवारच्या सत्रात दोन महिन्यांतील सर्वात मोठी निर्देशांक उडी घेणारा सेन्सेक्स शुक्रवारी १६१.१९ अंशांनी वाढून २६,३९२.३८ वर पोहोचला, तर ५३ अंशांची वाढ नोंदवत निफ्टी ८,००१.९५ पर्यंत स्थिरावला.
अमेरिकेच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाचे वाढते आकडे लक्षात घेत जागतिक महासत्ता पुन्हा एकदा सुधाराच्या प्रवासावर पोहोचल्याबाबत गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारातील व्यवहार करताना समाधान व्यक्त केले. यामुळे चीनसह आशियाईतील बाजारही तेजीसह सुरू झाले.
ऑगस्टच्या वायदापूर्तीची अखेर करताना मुंबई निर्देशांकाने एकाच व्यवहारात गुरुवारी थेट ५१७ अंश उसळी घेतली होती. शुक्रवारची सेन्सेक्सची सुरुवातच २६,५०० पुढे झाली.
सप्ताहअखेरच्या व्यवहारात शुक्रवारी सेन्सेक्स २६,६८७.३३ पर्यंत झेपावला होता, तर सत्रअखेर ८,००० पुढील प्रवास कायम राखणारा निफ्टी व्यवहारात ८,०९१.८० पर्यंत गेला होता. मध्यंतरात नफेखोरीमुळे बाजारात अल्पकाळासाठी समभाग मूल्यांवर काहीसा दबाव निर्माण झाला होता. पण बाजार पुन्हा लवकरच सावरला.
साप्ताहिक तुलनेत मात्र सेन्सेक्सने ९७३.६९ अंश घसरण नोंदविली आहे. मुंबई निर्देशांकाची गेल्या तिमाहीतील ही सर्वात मोठी साप्ताहिक घसरण आहे, तर निफ्टीतील नुकसान २९८ अंशांचे आहे.
शुक्रवारी सेन्सेक्समधील वेदांता, ओएनजीसी, भारती एअरटेल, बजाज ऑटो यांच्या समभागांना मागणी राहिली. प्रमुख मुंबई निर्देशांकांतील २० कंपन्यांच्या समभागांचे मूल्य वाढले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये माहिती तंत्रज्ञान, पायाभूत सेवा क्षेत्र, वाहन आदी आघाडीवर राहिले.
‘सेन्सेक्स’मध्ये तेजी कायम
नव्या महिन्यातील वायदापूर्तीच्या व्यवहारांची सुरुवात तेजीसह करताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दीडशेहून अधिक अंशवाढीने २६,४०० नजीक पोहोचला,

First published on: 29-08-2015 at 06:51 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bse smallcap index up third straight day