सरकारचा पर्यटन क्षेत्राविषयी असलेला व्यावसायिक आणि धोरणी दृष्टिकोन ही चांगली सुरुवात आहे, असे म्हणायला हरकत नाही. पर्यटन उद्योगासाठी असलेला हा व्यावसायिक दृष्टिकोन आणि नियोजनाची अंमलबजावणी होईल, अशी तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात असेल, अशी आशा आहे. पर्यटन उद्योगाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ विस्तारण्याच्या दृष्टीने आणि दळणवळणाची साधने मजबूत करण्याच्या दृष्टीने पाच मुख्य घटकांवर अर्थसंकल्पात लक्ष केंद्रित केले जावे. रस्ते, रेल्वे, जल वाहतूक, हवाई वाहतूक या सगळ्यांना एकत्र जोडणारी सक्षम दळणवळण आणि संपर्क व्यवस्था उभारणे, सध्याच्या कररचनेत बदल (व्हॅटचा परतावा, सर्व राज्यांमध्ये कररचनेतील सुसूत्रता, कृषि क्षेत्राचा विकास), आणखी काही देशांसाठी ‘व्हिसा ऑन अरायव्हल’ची सुविधा उपलब्ध करून देणे, महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना आणि पुरेशा प्रसाधनगृहांची सोय आणि सर्वात महत्वाचे म्हणजे देशांतर्गत पर्यटन तसेच परदेशातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी प्रभावी विपणन प्रणालीचा विकास यावर भर दिला जाईल किंवा त्यासाठी जास्तीत जास्त निधीची तरतूद होईल, अशी अपेक्षा आहे.
-राजेश मॅगो, सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, मेक माय ट्रीप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पर्यटन उद्योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे आणि त्याचाच फायदा अर्थसंकल्पातून पर्यटन उद्योगाच्या विकासासाठी भरीव तरतूदी करण्यात होईल, असे वाटते. भारतातील पर्यटन उद्योग वेगाने विस्तारतो आहे मात्र, आणखी पुढे जाण्यासाठी या क्षेत्रासमोर काही मुलभूत आव्हाने आहेत. इथे पर्यटन विकासाचा विचार करताना देशांतर्गत पर्यटन, इथून परदेशात जाणारे पर्यटक आणि परदेशातून इथे येणारे पर्यटक या सर्वाचा तपशीलवार आणि स्वतंत्रपणे विचार करणे अपेक्षित आहे. भारतात जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा देणाऱ्या पर्यटन स्थळांचा आणखी विकास व्हायला हवा. आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करतील अशी पर्यटन स्थळे शोधून तिथे जागतिक दर्जाच्या दळणवळण सुविधा निर्माण करणे, हवाई इंधन आणि विमानतळांच्या व्यवस्थेपोटी राज्याराज्यातून आकारल्या जाणाऱ्या करांमध्ये असलेली तफावत आणि एकूणच महागडा हवाई प्रवास ही पर्यटन उद्योगासमोरची मुख्य आव्हाने आहेत. त्यामुळे रस्ते, महामार्ग यांच्या विकासासाठी भरीव आर्थिक निधी उपलब्ध करून देणे, करव्यवस्थेचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे. देशभरात विविध ठिकाणी विमानतळे उपलब्ध होऊ शकतील. मात्र, त्यादृष्टीने काही नियोजन नाही किंवा काहीठिकाणी बांधलेली विमानतळे कार्यान्वित करण्यात आलेली नसल्याने हवाईमार्गाने होणारी वाहतून मर्यादित स्वरुपातील आहे. त्यात आणखी वाढ व्हायला हवी. स्वच्छ रस्ते, महामार्ग, चांगली वाहतूक व्यवस्था यांच्याबरोबरीने जास्तीत जास्त पर्यटक भेट देण्यासाठी उत्सूक होतील, असे जागतिक दर्जाच्या थीम पार्क किंवा तत्सम पर्यटन स्थळांची निर्मिती करणे आवश्यक झाले आहे.