“काश्मीर संदर्भातील कविता सादर केल्याने एक बिलीयन डॉलरचा तोटा भरुन निघणार नाही,” असा टोला काँग्रेसने अर्थमंत्री अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना लगावला आहे. सीतारामन यांनी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मुख्य अर्थसंकल्प सादर करण्याआधी सीतारामन यांनी काश्मिरी भाषेतील एक कविता सादर केली. यावरुनच काँग्रेसने अर्थसंकल्प मांडत आहात की कवितांचा कार्यक्रम सुरु आहे असा टोलाही लगावला आहे.
काय म्हणाल्या निर्माला सितारामन?
मुख्य अर्थसंकल्प सादर करण्याआधी सितारामन यांनी काश्मिरी भाषेतील एक कविता सादर केली. त्यांनंतर त्यांनी कवितेचे हिंदीमध्ये भाषांतर सादर केले. “आमचा देश हा शालिमार बागेसारखा फुलेला आहे. आमच्या देश दाल तलावामध्ये खुलेल्या कमळासारखा आहे. आमचा देश तरुणांच्या सळसळत्या रक्तासारखा आहे. माझा देश जगातील सर्वात प्रिय देश आहे”, असा या कवितेचा अर्थ असल्याचे सितारामन यांनी सांगितले.
काँग्रेसचे म्हणणे काय?
सितारामन यांनी सादर केलेल्या कवितेवरुनच काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते जयवीर शेरगील यांनी ट्विटवरुन टीका केली. “काश्मीरसंदर्भातील (काश्मिरी भाषेमध्ये) कविता सादर केल्याने व्यापारामध्ये झालेला एक बिलीयन डॉलरचा तोटा भरुन निघणार नाही, पाच ऑगस्टपासून खासगी श्रेत्रातील एक लाख लोकांनी गमावलेल्या नोकऱ्या त्यांना परत मिळणार नाहीत. अर्थसंकल्प हा आर्थिक अडचणींवर उत्तर शोधण्यासाठी आहे की कविता आणि संवादांचे वाचन?” असा सवाल शेरगील यांनी उपस्थित केला आहे.
Narrating a poem on #Kashmir will not compensate $ 1 billion trade loss, 1 Lac Job Loss in private sector since August 5 – Is Budget scripting a solution to economic mess or is it merely a script of poetry & dialogues? #BudgetSession2020 #Budget2020
— Jaiveer Shergill (@JaiveerShergill) February 1, 2020
अर्थसंकल्पाआधीही काँग्रेसकडून भाजपाला टोला
अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी सभागृहात जाण्याआधीच काँग्रेसचे लोकसभेचे नेते आणि खासदार अधीर रंजन चौधरी यांनी भाजपावर निशणा साधला. “अर्थव्यवस्थेच्या चिंध्या झाला आहेत. आता निर्मलाजी यावर फक्त कॉस्मॅटीक सर्जरी करुन डागडुजीच करु शकतात. कारण भाजपा सरकार केवळ पाकिस्तान आणि इम्रान खान मुसलमान याबद्दलच बोलताना दिसत आहे,” असा टोला चौधरी यांनी लगावला.