केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. सकाळी ११ वाजता सीतारामन यांनी संसदेमध्ये अर्थसंकल्प वाचण्यास सुरुवात केली. यावेळी सीतारामन यांनी भांडवली गुंतवणूक वाढवून ५.५४ लाख कोटी रुपयांची केल्याची घोषणा निर्मला यांनी केली. यावेळी त्यांनी भविष्यामध्ये भारतात मेट्रो लाइट आणि मेट्रो नॅनो तंत्रज्ञानावर आधारित सार्वजनिक वाहतूक यंत्रणा उभारली जाणार असल्याची घोषणा केली आहे. देशातील टू टीयर आणि वन टीयर शहरांच्या आजूबाजूच्या भागामध्ये या मेट्रोचं जाळं उभारलं जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी राखून ठेवण्यात आलेल्या विशेष निधीमध्ये महाराष्ट्रातील दोन शहरांचाही उल्लेख आहे. नागपूरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोचं काम होणार असून नाशिकमध्येही मेट्रो येणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केलीय. नाशिक मेट्रोसाठी केंद्राने असाप्रकारे पहिल्यांदाच निधी उपलब्ध करुन दिलाय.

भारतामध्ये मेट्रो आणि बस वाहतुकीचे जाळे अधिक घट्ट करण्यासाठी विशेष तरतूद करत असल्याची घोषणा निर्मला यांनी केली आहे. निर्मला यांनी देशातील वेगवेगळ्या भागांमधील शहरांसाठी मेट्रोचं काम करण्याच्या दृष्टीने निधी कशापद्धतीने देण्यात येणार आहे यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये महाराष्ट्राची उपराजधानी असणाऱ्या नागपूरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोचं जाळं उभारण्यासाठी पाच हजार ९०० कोटी रुपये दिले जाणार असल्याचं निर्मला यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे नाशिकमध्येही मेट्रोचं काम होणार असून यासाठी दोन हजार ९२ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा निर्मला यांनी केली आहे.

आणखी वाचा- Budget 2021: असे असणार Income Tax Slab; कोणाला किती कर भरावा लागणार जाणून घ्या

दक्षिणेमधील बंगळुरु आणि चेन्नईसारख्या मोठ्या शहरांनाही मेट्रोची सेवा उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. बंगळुरुमधील मेट्रोचा विस्तार करण्यासाठी १४ हजार ७८८ रुपये देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. या पैशांमधून बंगळुरु मेट्रोचं जाळं ५८.१९ किलोमीटरने वाढवण्यात येणार आहे. याचप्रमाणे चेन्नईमध्येही मेट्रोच्या दुसऱ्या मार्गाचं काम केलं जाणार असून हा मार्ग ११८.९ किलोमीटरचा असणार आहे. यासाठी ६३ हजार २४० रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे.

Story img Loader