संसदेमध्ये आज देशाचा अर्थसंकल्प सादर झाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. आरोग्य क्षेत्रासाठी तिप्पट तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय करोना लसीकरणासाठीही विशेष तरतूद करण्यात आली आहे. मात्र या अर्थसंकल्पावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कठोर शब्दात टीका केली आहे. या अर्थसंकल्पामधून महाराष्ट्राची मोठी निराशा झालीय अशी टीका राऊतांनी केलीय. मात्र त्याचप्रमाणे राऊतांनी अर्थसंकल्पातील आकडेवारीवरुनही सरकारवर टीका केलीय. सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेमध्ये अर्थसंकल्प सादर केल्यास त्याची पाठ आम्हाला थोपटता येईल असा खोचक टोला राऊतांनी लगावला आहे.

“महाराष्ट्र व मुंबईतून देशाला सगळ्यात जास्त महसूल मिळतो. परंतु महाराष्ट्राच्या वाट्याला या अर्थसंकल्पात काहीही मिळालेलं नाही. महाराष्ट्रानं देशाला देण्याची दानत दाखवली आहे. पण महाराष्ट्रावर मात्र नेहमी अन्याय होत आलेला आहे. आकडे अर्थमंत्री देत आहेत. त्यातले किती आकडे खरे आहेत किती खोटे आहेत हे सहा महिन्यात कळेल,” असं राऊत यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दिल्लीमध्ये राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आणखी वाचा- Budget 2021: केंद्राने मुंबईतील मेट्रो कारशेडची जमीन मंगळावरुन आणलीय की चंद्रावरुन?

तसेच पुढे बोलताना राऊत यांनी, “आपल्या अर्थमंत्री वेगवेगळी आकडेवारी सांगत आहेत. आम्हाला त्या आकडेवारीत फारसं जायचं नाही. काहीजण अर्थसंकल्पाचा अभ्यास करुन त्यातून अर्थ काढतील. मात्र अर्थसंकल्पात आर्थिक थापा मारणं बंद केलं पाहिजे,” असा टोला लगावला आहे. त्याचप्रमाणे, “अर्थसंकल्प कोणाचाही असला तरी सर्वसामान्यांना पोटाची आणि भूकेची भाषा कळते. तरुणांना बेरोजगारीची भाषा कळते. अशा काही सोप्या भाषेत अर्थसंकल्प मांडला तसेच त्यातून काही कृती झाली तर आम्हाला त्या अर्थसंकल्पाची पाठ थोपटता येईल,” अशा खोचक शब्दांमध्ये राऊत यांनी मोदी सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पातील आकडेवारीवर टीका केली.

आणखी वाचा- Budget 2021: सर्वाधिक निराशा महाराष्ट्राच्या वाट्याला – संजय राऊत

याचबरोबर राऊत यांनी आगामी काळामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अर्थसंकल्प सादर केला असेल तर या अर्थसंकल्पाला देशाचा अर्थसंकल्प न म्हणता पक्षाचा अर्थसंकल्प म्हणावं असाही टोला लगावला आहे.

Story img Loader