केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. सकाळी ११ वाजता सीतारामन यांनी संसदेमध्ये अर्थसंकल्प वाचण्यास सुरुवात केल्यानंतर करोनासंदर्भातील उल्लेख केला. करोनामुळे यंदा सर्व गोष्टींचा फटका बसला असल्याचं सांगितलं. मात्र त्याचवेळी त्यांनी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये मिळवलेल्या विजयाचा उल्लेख करत भारतीयांचा निर्धार हा ठाम असतो असंही सीतारमन यांनी म्हटलं आहे.

निर्मला सितारमन यांनी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिकेमध्ये मिळवलेला विजय हा भारतीय तरुणाईचे प्रतिनिधित्व करणारा असल्याचं म्हटलं आहे. तरुणांमधील जिद्द आणि देशातील जनतेमधील इच्छाशक्ती दाखवणारा हा विजय होता असंही निर्मला यांनी म्हटलं आहे. याचप्रमाणे निर्मला यांनी करोनाच्या लढ्यामध्ये भारतीयांनी जी जिद्द दाखवली त्यासाठी मी त्यांना सलाम करते असंही म्हटलं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविंद्रनाथ टागोरांच्या वचनाची यावेळेस आठवण करून दिली. ज्यावेळी पहाट अंधारलेली असते त्यावेळी विश्वास हाच आशेचा किरण असतो, असं निर्मला यांनी म्हटलं. या वचनाचा संदर्भ देत भारताची अर्थव्यवस्था अशाच प्रकारे झेप घेईल असा विश्वास व्यक्त केला.

अ‍ॅडलेडच्या पहिल्या कसोटी सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने त्यानंतर फिनिक्सभरारी घेत प्रतिष्ठेचा बॉर्डर-गावस्कर चषक पुन्हा आपल्याकडे राखला. ब्रिस्बेनच्या चौथ्या कसोटी सामन्यात १९ जानेवारी रोजी भारताने ऑस्ट्रेलियाच्या ३२८ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करीत तीन गडी राखून झुंजार विजय मिळवला आणि चार कसोटी सामन्यांच्या मालिकेवर २-१ असा कब्जा केला. २००० नंतरच्या कसोटी क्रिकेट इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा हा विजय अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने साकारला. या कसोटी मालिकेत विराट कोहली, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि जसप्रित बुमरा यांच्यासारखे मातब्बर खेळाडू पूर्णत: उपलब्ध नसतानाही भारताने ही किमया साधली. २०१८-१९मध्ये स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर २-१ असा विजय मिळवला होता. या वेळी स्मिथ-वॉर्नर असतानाही भारताने असंख्य नवोदित खेळाडू आणि दुखापतींचे आव्हान पेलत हा मालिकाविजयाचा अध्याय लिहिला.

मोदींनी केला होता उल्लेख…

यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या विजयाचा हवाला देत २२ जानेवारी रोजीच्या एका भाषणामध्ये विद्यार्थांना आत्मनिर्भर होण्याचा सल्ला दिला होता. आसाममधील तेजपूर विद्यापीठाच्या १८ व्या दीक्षांत समारंभाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना मोदींनी या विजयाचा उल्लेख केला होता.  कमी अनुभव असलेल्या आणि दुखापतग्रस्त भारतीय संघानं न खचता निर्धार आणि ध्येयानं जगातील सर्वोत्तम संघाचा त्यांच्याच देशात पराभव केला. एकप्रकारे टीम इंडियानं सर्वांना आत्मनिर्भरतेचा धडा शिकवला आहे. आपण सर्वांनी त्यांच्याकडून या गोष्टी शिकायला हव्यात, असं मोदी म्हणाले होते.

Story img Loader