केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आर्थिक वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये भविष्यामध्ये भारतात मेट्रो लाइट आणि मेट्रो नॅनो तंत्रज्ञानावर आधारित सार्वजनिक वाहतूक यंत्रणा उभारली जाणार असल्याची घोषणा केली. विशेष म्हणजे देशभरातील वेगवेगळ्या शहरांना देण्यात आलेल्या निधीमध्ये महाराष्ट्रातील नागपूर आणि नाशिकचा समावेश आहे. मात्र एकीकडे मुंबईमधील मेट्रोच्या कामामध्ये केंद्र सरकार खोडा घातला असल्याचे सांगत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रावर टीका केली आहे. केंद्राने मुंबईतील मेट्रो कारशेडची जमीन मंगळावरुन आणलीय की चंद्रावरुन?, असा खोचक सवाल राऊत यांनी विचारला आहे.

नक्की वाचा >> Budget 2021: मोठी बातमी! नाशिक मेट्रोसाठी हजारो कोटींची घोषणा; नागपूरमध्येही ‘मेट्रो फेज टू’

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दिल्लीमध्ये राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राऊत यांना नाशिक आणि नागपूरमध्ये भाजपाची सत्ता असल्याने त्यांना मेट्रो प्रकल्प देण्यात आलाय अशी टीका केली जात असल्याच्या मुद्द्यावरुन पत्रकारांनी राऊत यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना, “हा दावा मला पटत नाही. कारण नाशिक आणि नागपूरमध्ये यापुढे भाजपाची सत्ता राहणार नाही. नाशिकमध्ये नक्कीच सत्ता राहणार नाही आणि भाजपामध्ये मोठं युद्ध होईल. नागपूरमध्ये मेट्रोचं काम सुरु आहे. नाशिकमध्ये मेट्रोसंदर्भात अभ्यास सुरु आहे,” असं मत नोंदवलं.

पुढे बोलताना मुंबई मेट्रो केंद्रानं का रखडवून ठेवली आहे याबद्दल त्यांनी बोलावं, अशी मागणी राऊत यांनी केली. “केंद्राची जमीन आहे, केंद्राची जमीन आहे म्हणत मुंबई मेट्रोचा प्रकल्प रखडवला आहे. ती जमीन केंद्रानं महाराष्ट्रात मंगळावरुन आणलीय की चंद्रावरुन?, आहो ती आमचीच जमीन आहे. मुंबई मेट्रो आम्हाला सुरु करु द्या ना. तुम्ही आम्हाला नागपूर नाशिकचं काय सांगताय. ही दोन्ही शहरं महाराष्ट्रातच आहे काय उत्तर ध्रुवावर नाहीयत,” असं मत राऊत यांनी वय्क्त केलं.

महाराष्ट्राची उपराजधानी असणाऱ्या नागपूरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोचं जाळं उभारण्यासाठी पाच हजार ९०० कोटी रुपये दिले जाणार असल्याचं निर्मला यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे नाशिकमध्येही मेट्रोचं काम होणार असून यासाठी दोन हजार ९२ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा निर्मला यांनी केली आहे. नाशिक मेट्रोसाठी केंद्राने अशाप्रकारे पहिल्यांदाच निधी उपलब्ध करुन दिलाय.

Story img Loader