‘मराठी बिझनेस क्लब’च्या चौथ्या स्थापना दिनानिमित्त जाहीर करण्यात आलेला ‘उद्योगतारा’ पुरस्कार वितरण सोहळा नुकताच मुंबईत पार पडला.
उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील के अॅन्ड के ग्रुपचे विवेक कवळे व समीर काळे, हंटर सिक्युरिटी फोर्सचे समाधान निकम, डॉ. शैलेश श्रीखंडे, लता कारेवार, अथर्व समुहाचे सचिन गोसावी या उद्योजकांना यावेळी उद्योगतरा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दादर (पश्चिम) येथील वीर सावरकर स्मारक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ‘बीव्हीजी इंडिया’चे संस्थापक व अध्यक्ष हनुमंत गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. क्लबचे अध्यक्ष सुहास कुंभार हेही यावेळी उपस्थित होते.
‘कोकुयो कॅम्लिन’चे सुभाष दांडेकर ‘भारताचे भूषण’ने सन्मानित
मुंबई : शालोपयोगी वस्तू निर्मितीतील आघाडीच्या कोकुयो कॅम्लिनचे मानद अध्यक्ष सुभाष दांडेकर यांना भारताचे भूषण म्हणून गौरविण्यात आले आहे. जागतिक सल्ला व संशोधन महामंडळाच्या (डब्ल्यूसीआरसी) वतीने देशस्तरावरील महाराष्ट्रातून आघाडीचे उद्योजक म्हणून नेतृत्व मिळविल्याबद्दल हा सन्मान करण्यात आला आहे.वित्तसंस्था केपीएमजीच्या पुरस्कार निवड प्रक्रियेसाठी ५०० हून अधिक शिफारसी आल्या होत्या. पैकी ३५ मधून सुभाष दांडेकर यांची निवड करण्यात आली.
‘एल अॅन्ड टी’चे ए. एम. नाईक ‘बिझनेस इंडिया ऑफ द इयर’
मुंबई : ‘बिझनेस इंडिया’तर्फे दिला जाणारा यंदाचा पुरस्कार लार्सन अॅन्ड टुब्रोचे (एल अॅन्ड टी) कार्यकारी अध्यक्ष ए. एम. नाईक यांना जाहीर झाला आहे. नाईक यांच्या नेतृत्वाखाली देशातील आघाडीच्या कंपनीने गाठलेल्या क्रांतीकारी टप्प्याबद्दल त्यांना ‘बिझनेस इंडिया ऑफ द इयर’ने सन्मानित करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
१९८२ ची स्थापना असलेल्या ‘बिझनेस इंडिया’ व्यासपीठामार्फत दिला जाणारा यंदाचा ३३ वा पुरस्कार आहे. यापूर्वी हा मान उद्योगपती रतन टाटा, मुकेश अंबानी, कुमारमंगलम बिर्ला, सुनिल भारती मित्तल यांना मिळाला आहे.
हर्षवर्धन चितळे फिलिप्स लाईटनिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी
मुंबई : विद्युत उपकरण निर्मितीत आघाडीवर असणाऱ्या फिलिप्सच्या लाईटिंग सोल्युशन विभागाचे दक्षिण आशियातील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून हर्षवर्धन चितळे यांची नियुक्ती झाली आहे.
भारतातील दिवे व्यवसाय विभागाचीही जबाबदारी त्यांच्याकडे नव्या वर्षांपासून आली आहे. चितळे यांनी यापूर्वी एचसीएल इन्फोसिस्टिम्समध्ये तसेच एचसीएल हेल्थकेअरमध्येही महत्वाची पदे भूषविली आहेत. रॉयल फिलिप्स नावाने ओळखले जाणाऱ्या फिलिप्सने २०१३ अखेर एकूण २३.३ अब्ज युरोची विक्री नोंदविली असून समुहात १.१२ लाखांहून अधिक मनुष्यबळ आहे.
ज्युबिलिंट लाईफ सायन्सेसला नव्या औषधांसाठी अमेरिकेची परवानगी
मुंबई : भारतीय औषध निर्मिती क्षेत्रातील नवागत ज्युबिलिंट लाईफ सायन्सेसला तिच्या नव्या औषधांसाठी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाची परवानगी मिळाली आहे.उच्च रक्तदाबावरील मूळच्या ‘डायव्हॅन’ औषधाचे अंश असलेल्या व्हॅलसार्टन गोळ्यांसाठी ही परवानगी मिळाली आहे. यानंतर आता या औषधाची निर्मिती लवकरच सुरू करण्यात येईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. अमेरिकेत या औषधाची बाजारपेठ २ अब्ज डॉलर असेल, असेही नमूद करण्यात आले आहे. कंपनीचे भारतासह विविध देशांमध्ये १० उत्पादन प्रकल्प आहेत.
महाराष्ट्रात जन धन योजनेची ६७ लाख बँक खाती
मुंबई : पंतप्रधान जन धन योजनेंतर्गत महाराष्ट्रात गेल्या चार महिन्यात ६७ लाख बँक खाती सुरू झाल्याची माहिती सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने दिली आहे.अनेक बँकांनी या कालावधीत राज्यात १३ हजारांहून अधिक बँक प्रतिनिधी नेमल्याचेही नमूद करण्यात आले आहे. देशात प्रत्येक कुटुंबाचे बँक खाते असावे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने २८ ऑगस्ट २०१४ रोजी जन धन योजनेला सुरुवात झाली होती. महाराष्ट्रात या मोहिमेची सुरुवात केंद्रीय ऊर्जा व कोळसा मंत्री पियुष गोयल यांनी केली होती.
जैन इरिगेशनला केंद्र सरकारचा नाविन्येतबद्दल पुरस्कार
मुंबई : कृषी क्षेत्रातील महाराष्ट्रातील आघाडीच्या जैन इरिगेशनला केंद्र सरकारच्या जलसिंचन व ऊर्जा विभागाचा पुरस्कार मिळाला आहे.
जल स्त्रोत क्षेत्रातील निर्मिती आणि सेवेबाबत नाविन्यपूर्ण उपक्रमासाठीहा हा पुरस्कार नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला आहे. केंद्रीय नदी विकास राज्य मंत्री सवरलाल जाट यांच्या हस्ते हा पुरस्कार कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी नवी दिल्ली येथे स्विकारला. केंद्रीय नदी विकास खात्याच्या मंत्री उमा भारती याही यावेळी उपस्थित होत्या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा