पॉकेटसर्फर स्मार्टफोन्ससारखी इंटरनेटसमर्थ किफायती उत्पादने प्रस्तुत करणाऱ्या डेटाविंडने आता सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या १०.१ इंची टॅब्लेट्स श्रेणीत प्रवेश करून स्पर्धेला आणखी धार दिली आहे. या मोठय़ा आकारमानाच्या टॅब्लेट्समधील किमतीचा नवीन पायंडा घालून देताना, डेटाविंडने ते केवळ ५,९९९ रुपये अशा किमतीत आणले आहेत. या शिवाय डेटाविडने १० इंचांचेच एम्बेडेड थ्रीजी मोडेमने युक्त टॅब्लेट कॉम्प्युटरही प्रस्तुत केले असून, त्याचीही किंमत ९,७९९ रुपये निश्चित केली आहे. ही दोन्ही नवीन उत्पादने कंपनीने स्नॅपडिल या ई-व्यापार मंचाद्वारे ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचे ठरविले आहे.
अर्थसंकल्पाची तयारी सुरू
नवी दिल्ली: अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून संसदेत दुसऱ्यांदा मांडले जाणाऱ्या अर्थसंकल्पाची तयारी सुरू झाली असून येत्या ६ जानेवारीपासून अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलतीसाठी जेटली हे बैठका घेणार आहेत. सुरुवातीच्या बैठका कामगार संघटना, वित्त संस्था तसेच अर्थतज्ज्ञांबरोबर होतील. व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्रातील मतेही ते जाणून घेणार आहेत. बँका, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींबरोबरही त्यांची चर्चा जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात होतील. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील पूर्ण बहुमताने सत्तेत आल्यानंतर जेटली यांनी पहिला अर्थसंकल्प जुलैमध्ये मांडला होता.
चीनमधील बडय़ा उत्पादकांचा उद्यापासून मुंबईत मेळावा
मुंबई: ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, फर्निचर व फिक्स्चर्स, एलईडी आणि प्रकाश उपकरणे ते फॅशन ज्वेलरी, तयार वस्त्रप्रावरणे, भेटवस्तूंपासून, मशीन टुल्स, बिल्डिंग मटेरियल्स आणि इक्विपमेंट्स आदी चीनमधील विविध उद्योग क्षेत्रांतील २० आघाडीचे निर्माते त्यांची उत्पादने घेऊन मुंबईत आयोजित बी २ बी प्रदर्शन व संमेलनासाठी येत आहेत. चायना प्रॉडक्ट्स एक्झिबिशन २०१४ नावाने हा तीन दिवसांचा कार्यक्रम येत्या १८ ते २० डिसेंबर २०१४ दरम्यान गोरेगाव (पूर्व) येथील मुंबई प्रदर्शन केंद्रात योजण्यात आला आहे. या तीन दिवसांत भारतभरातून १० ते १२ हजार व्यापारी खरेदीदार या निमित्ताने येथे येतील, अशी आयोजकांना अपेक्षा आहे. यंदाचे हे मेळाव्याचे १२वे वर्ष असून, या निमित्ताने चीनमधील निर्मात्यांशी खरेदीदार-व्यापाऱ्यांना आमनेसामने वाटाघाटीची संधी देण्यात आली आहे.
‘अॅक्रिसिल’कडून ब्रिटनमधील कंपनीवर ताबा
मुंबई : स्वयंपाकघरासाठी स्टेनलेस स्टील सिंकच्या उत्पादनांतील अग्रणी अॅक्रिसिल लिमिटेडने ब्रिटनस्थित किचन सिंक क्षेत्रातील कंपनी होमस्टाइल प्रॉडक्ट्स लिमिटेडमध्ये ७४ टक्के भांडवली मालकी मिळविली आहे. अॅक्रिसिल यूके लिमिटेड या उपकंपनीमार्फत हा ताबा व्यवहार २०.५० कोटी रुपयांच्या मोबदल्यात पूर्ण करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा