मूडीज्पाठोपाठ, गोल्डमॅन सॅक्सचाही ‘अर्थ’भरवशाचा शेरा!
 
‘मूडीज्’पाठोपाठ ‘गोल्डमॅन सॅक्स’ या अन्य एका आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेनेही भारतीय अर्थव्यवस्थेच्या आगामी प्रगतीबद्दल गुरुवारी दांडगा भरवसा व्यक्त केला. आर्थिक विकासाच्या वाटेवर देशाचा पुन्हा एकदा दमदार प्रवास सुरू होणार असून महागाईवर नियंत्रण राखण्यातही यश मिळेल, असा शेरा तिने  बहाल केला आहे. केंद्र सरकारने मार्च २०१३ अखेर आर्थिक विकासदर कसाबसा ६ टक्क्यांपर्यत जाईल म्हटले असताना या संस्थेने मात्र तो ६.५ टक्के असेल, असे छातीठोक सांगून शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’लाही बहुप्रतीक्षित १९ हजारांपल्याड नेऊन ठेवले.
दोनच दिवसांपूर्वी ‘मूडीज’ने भारताचे पतमानांकन ‘स्थिर’ असे कायम ठेवले आहे. आर्थिक सुधारणांच्या वाटेवर आशा व्यक्त करताना मूडीज्ने भारताचा विकास दर मार्च २०१३ पर्यंत ५.४ टक्क्यांपर्यंत त्यापुढील आर्थिक वर्षांत ६ टक्क्यांपर्यंत जाईल, असे म्हटले होते. त्याला प्रतिसाद म्हणून सेन्सेक्सने त्रिशतकी तेजी नोंदविली, तर ‘निफ्टी’ने आज ५,६०० ची मानसिक टप्पाही पार केला होता.
देशांतर्गत आर्थिक सुधारणांची प्रक्रिया आणि जागतिक स्तरावर संभाव्य सकारात्मक वातावरण यामुळे भारतीय अर्थव्यवस्था २०१२-१३ या संपूर्ण आर्थिक वर्षांत ६.५ टक्के विकासदर गाठेल, असा विश्वास ‘गोल्डमॅन सॅक्स’ने आपल्या ताज्या अहवालात व्यक्त केला आहे. २०१४ आर्थिक वर्षांतही देशाचा विकास दर ७.२ टक्के असेल, असा आशावादही तिने दर्शविला आहे.
आर्थिक सुधारणा या गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण करणाऱ्या असून संभाव्य व्याजदर कपातीची अपेक्षाही आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने व्यक्त केली आहे.  किराणा क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूक मर्यादेत वाढ, वस्तू व सेवा कर, अनुदानाची रक्कम थेट लाभार्थीना देण्याची मोहीम हेही अर्थव्यवस्थेच्या विकासात भर घालणारे निर्णय ठरतील, असेही निरीक्षण अहवालात मांडण्यात आले आहे.
चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीअखेपर्यंत संथ आर्थिक विकास, वाढती महागाई, व्यापारी व वित्तीय अशी दुहेरी तूट यांची चिंता या देशासाठी कायम राहण्याचे नमूद करून या बाबी गुंतवणूक चक्राला नकारात्मक वळण लावण्याची भीती मात्र अहवालाने व्यक्त केली आहे.
केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षांचा विकास दर ५.५ ते ६ टक्के अभिप्रेत धरला आहे. तर पहिल्या तिमाहीअखेर हा दर ५.५ टक्के राहिला आहे. जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीतील विकासदराचे आकडे उद्याच, शुक्रवारी प्रसूत होणार आहेत.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा