पिरामल समूहाचा आरोग्यनिगा क्षेत्रातील उपक्रम पिरामल हेल्थकेअरने महिलांकरिता ‘आय कॅन हेल्प’नावाचे मार्गदर्शक व्यासपीठ खुले केले आहे. महिलांच्या करिअर नियोजन अचानक गर्भधारणेमुळे विस्कळीत होते आणि प्रसंगी अशी स्त्री जीवनावरील नियंत्रणही गमावते. या पाश्र्वभूमीवर आघाडीचे मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशकांच्या चमूने सुसज्ज ही मदतवाहिनी म्हणजे महिला सक्षमीकरणाचे एक पाऊल ठरावे, असा पिरामलचा दावा आहे. या मदतवाहिनीशी गरजू स्त्रियांना icanhelp.in या वेबसाइटवर जाऊन थेट स्त्रीरोगतज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञांशी व्हिडीओ चॅट स्वरूपात संवाद साधता येईल. अथवा १८०० २२ ०५०२ या नि:शुल्क क्रमांकावर तसेच मोबाईलवरून कउअठ असा लघुसंदेश ५६०७० या क्रमांकावर पाठवून आपल्या शंका-समस्येचे निराकारण करता येईल.
कल्याण ज्वेलर्स’ मुंबईत; ठाणे, वाशीतही लवकरच
दक्षिण भारतातील चार राज्ये आणि गुजरातमध्ये एकूण ४५ शोरूम्स असलेल्या अग्रगण्य सुवर्ण-आभूषणे विक्री शृंखला कल्याण ज्वेलर्सने आता मुंबईत धडाक्याने प्रवेश घोषित केला आहे. येत्या २४ मार्च रोजी कल्याण ज्वेलर्सची सदिच्छादूत ऐश्वर्या राय हिच्या हस्ते त्यांच्या वाशी, ठाणे आणि बोरिवली येथे तीन शोरूम्सचे उद्घाटन होत आहे.
भारतात सर्वाधिक सोनेखरेदी होत असलेल्या दक्षिणेतील राज्यात कल्याण ज्वेलर्सने निर्विवाद वर्चस्व स्थापित केले असून, २०१२-१३ मध्ये देशभरात अस्तित्व निर्माण करण्याच्या उद्देशाने १००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे नियोजन असल्याचे कल्याण ज्वेलर्सचे अध्यक्ष टी. एस. कल्याणरमण यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. २०१४ परदेशातही २० शोरूम्स उघडण्याचे विस्तार धोरण आखण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आगामी तीन वर्षांत देशांतील सर्व अव्वल तसेच द्वितीय श्रेणींच्या शहरांमध्ये कल्याण ज्वेलर्सचे स्थान राहील, अशी एकूण शोरूम्सची संख्या ८० वर नेण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आली असल्याचे कल्याणरमण यांनी सांगितले. या शिवाय विदेशात जीसीसी देश, आखात, सिंगापूर, मलेशिया आणि श्रीलंका या देशांपर्यंत पोहचून विक्री उलाढाल १३,००० कोटी रुपयांवर नेली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘टीबीझेड’ नवी मुंबईत; वाटचाल ‘स्पेशल२६’कडे
तयार दागिने निर्मिती क्षेत्रात गेल्या दिडशे वर्षांपासून असलेल्या त्रिभुवनदास भिमजी झवेरीच्या नवी मुंबईतील नव्या दालनाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. वाशी येथील या दालनाचे उद्घाटन नवी मुंबईचे महापौर सागर नाईक यांनी केले. कंपनीच्या कार्यकारी संचालक बिनैशा झवेरी तसेच विपणन विभागाचे समूह प्रमुख किरण दीक्षित हेही यावेळी उपस्थित होते.
नवी मुंबई परिसरात कंपनीचे हे पहिले दालन आहे. तर वाशीतील दालन हे समूहातील २५ वे दालन आहे. सेक्टर १९-डीमधील पाम बिचवरील हे दालन २,९४८ चौरस फूट क्षेत्रफळ जागेत ते आहे.
यानिमित्ताने कंपनीने हिऱ्यांच्या दागिने घडणावळीवर तब्बल ५० टक्के तर सोने धातूच्या दागिने घडणावळीवर ३५ टक्क्यांची सूट देऊ करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेला लग्नाचा कालावधी लक्षात घेऊन कंपनीने हे पाऊल उचलल्याचे कंपनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत झवेरी यांनी सांगितले.
मुंबई परिसरानजीक वसई तसेच महाराष्ट्रातील नागपूर आणि औरंगाबाद येथे कंपनीचे नवे दालन नुकतेच सुरू करण्यात आले आहे. ७ राज्यातील १९ शहरांमध्ये कंपनीची आता २६ दालने झाली आहेत.
नाल्कोलाही प्रतिसाद
सार्वजनिक क्षेत्रातील नाल्कोच्या प्राथमिक समभाग विक्री प्रक्रियेलाही गुंतवणूकदारांची चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सरकारने लिलावासाठी जारी केलेल्या कंपनीच्या १२.८८ कोटी समभागांच्या तुलनेत १३.२१ लाख समभागांसाठी गुंतवणूकदारांनी बोली लावली. बाजारातील शुक्रवारच्या व्यवहारा दरम्यान कंपनीच्या माध्यमातून ५१५ कोटी रुपये सरकारला मिळणार आहेत. बोलीसाठी कंपनी समभागाचे मूल्य ४० रुपये निश्चित करण्यात आले असताना त्याला ४०.०१ ते ४०.३० रुपयांचा भाव मिळत होता. याद्वारे कंपनीतील १० टक्के हिस्सा सरकार विकणार आहे. गेल्या आठवडय़ात आरसीएफच्या भागविक्री प्रक्रियेला चांगला प्रतिसाद लाभला होता. निर्गुतवणुकीच्या प्रक्रियेतून सरकारने चालू आर्थिक वर्षांत २४,००० कोटी रुपयांचे उद्दीष्ट ठरविले आहे. आतापर्यंत केवळ २१,८०० कोटी रुपये जमा झाले आहेत.