नवी दिल्ली : ऑनलाइन शिकवणीतील नवतंत्रज्ञानाधारीत कंपनी आणि देशातील सर्वाधिक मूल्यांकन मिळविणारा नवउद्यमी उपक्रम असलेल्या बायजूने मोठय़ा प्रतीक्षेनंतर तिची वित्तीय कामगिरी अखेर बुधवारी जाहीर केली. वर्षभरापूर्वीच्या म्हणजे आर्थिक वर्ष २०२०-२१ सालाच्या विलंबाने जाहीर केलेल्या या ताळेबंदानुसार कंपनीचा महसूल घसरलाच, तर तोटाही २० पटींनी वाढला आहे.

कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निकालानुसार, २०२०-२१ या वर्षभरात बायजूचा महसूल एकत्रित आधारावर ३ टक्के घसरून २,४२८ कोटी रुपये झाला आहे. २०१९-२० या आधीच्या वर्षांत तो २,५११ कोटी रुपयांवर होता. तर बायजूने त्या आर्थिक वर्षांत ४,५८८ कोटी रुपयांचा तोटा नोंदवला आहे, जो २०१९-२० मधील २३१.६९ कोटी रुपयांच्या एकत्रित तोटय़ाच्या तुलनेत जवळपास २० पट अधिक आहे.

दिरंगाई कशामुळे?

बायजू ही खासगी मालकीची कंपनी असली तरी तिला तिचा वार्षिक आर्थिक ताळेबंद कंपनी व्यवहार मंत्रालयाला नियमितपणे सादर करणे बंधनकारक आहे. तथापि, २०२०—२१ आर्थिक ताळेबंद तिने विलंबाने जाहीर केला असला तरी तो अद्यप कंपनी व्यवहार मंत्रालयाला अधिकृतपणे तिने अद्याप दिलेला नाही. या विलंबामागेही डेलॉइट या लेखा संस्थेने कंपनीच्या निकालांवर स्वाक्षरी करण्यास दिलेला नकार कारणीभूत आहे. डेलॉइटने बायजूच्या विशिष्ट महसुली स्रोतांबाबत हरकती उपस्थित केल्या व त्याबाबत स्पष्टतेअभावी स्वाक्षरी न करण्याचा पवित्रा घेतला. परिणामी कंपनी व्यवहार मंत्रालयाकडे निकाल सादर करण्यासाठी बायजूने किमान चार वेळा मुदतवाढ मागून घेतली आणि या वाढीव मुदतीही तिला पाळता आलेल्या नाहीत.

Story img Loader